वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाची १९व्या आणि हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमाची १२व्या राष्ट्रीय वार्षीक आढावा बैठकीचे आयोजन दिनांक ०६ ते ०८ जानेवारी दरम्यान परभणी येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. दोन्ही बैठका कुलगुरु माननीय प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे उप-महासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कृषिविद्या,कृषि वाणिकी व हवामान बदलचे सहाय्यक महासंचालक डॉ. राजबीर सिंग, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, तसेच हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे समन्वयक जे.व्ही.एन.एस. प्रसादयांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
या बैठकीसाठी संपूर्ण देशातून ३० अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे १०० शास्त्रज्ञ उपस्थित राहणार असून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे तसेच हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे वरीष्ठ अधिकारी व शास्त्रज्ञ याशिवाय वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीदरम्यान हवामान बदलानुरुप कोरडवाहू शेती तसेच आधुनिक कोरडवाहू शेती तंत्रज्ञान याविषयी चर्चासत्र व आढावा घेण्यात येणार आहे.
सदरील राष्ट्रीय बैठकीमध्ये भारताच्या विविध राज्यातील संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञ उपस्थित राहून आपआपल्या राज्यातील कोरडवाहू शेतीतील संशोधनाचे निष्कर्ष सादर करणार आहेत. बदलत्या हवामानात कृषिमध्ये होणारे बदलानुरुप शेतीकरीता भविष्यातील दिशा, जोखीमा व त्यांचे नियोजन करण्याकरीता संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास्तव तथा व्यवस्थापनाकरीता सदरील बैठक अत्यंत महत्वाची आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कुलगुरु माननीय प्रा.(डॉ.) इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे तसेच प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.