Monday, January 6, 2025

वनामकृविमध्ये कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमाच्या बैठकीचे उद्घाटन

कोरडवाहू शेतीमध्ये जोखीम आणि आर्थिक व्यवस्थापन साधने गरजेचे... कुलगुरु मा.प्रा.(डॉ.) इन्द्र मणि

कुलगुरू माप्रा.(डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाची १९व्या आणि  हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमाची १२व्या राष्ट्रीय वार्षीक आढावा बैठक आयोजीत करण्यात आली. दोन्ही बैठकांचे उद्घाटन दिनांक जानेवारी रोजी झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि हे होते. मुख्य अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे उप-महासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी हे होते. व्यासपीठावर  हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भारतीय कृषि पद्धती संशोधन संस्थाचे संचालक डॉ. सुनील कुमार,हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जे.व्ही.एन.एस.प्रसाद,विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि  कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे आदींची उपस्थिती होती. बैठकीस संपूर्ण देशातून ७७ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला.  

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांनी संपूर्ण भारतातून कोरडवाहू शेती विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देऊन कार्य करणारे शास्त्रज्ञ परभणी येथे बैठकीमध्ये सहभागी झाले, याबद्दल आनंद व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, दूरदृष्टी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्रातील शेतीविकासाठी विभागवार चार कृषि विद्यापीठांची निर्मिती केली. या विद्यापीठाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन सतत पाठीशी उभे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मनुष्यबळाचा वापर कमी करून यांत्रिकीकरणावर भर देण्याचे सुचित केलेले आहे. यासाठी या बैठकीत विचार मंथन करून शेतकऱ्यांना वेळेत कार्य करता येण्यासारखे तंत्रज्ञान आणि अवजारे द्यावेत. कोरडवाहू शेतीमध्ये जोखीम आणि आर्थिक व्यवस्थापन साधने गरजेचे आहे, यासाठी कोरडवाहू शेतीस पूरक सिल्क आणि मिल्क सारखे प्रकल्प द्यावे लागतील. अचूक शेती पद्धती साठी यांत्रिकीकरण आणि स्वयंचलित शेती करावी लागेल. याबरोबरच वेळे, श्रम, आर्थिक बचत साधणाऱ्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना शेती व्यवसायात आकर्षित करावे लागेल. विशेषकरून शेतकऱ्यांना अवलंब करण्यासारख्या शिफारशी द्याव्यात असेही यावेळी त्यांनी सुचित केले. पुढे ते म्हणाले की, किफायतशीर कोरडवाहू शेतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने अनेक तंत्रज्ञान आणि वाण विकसित केले. यामध्ये प्रामुख्याने तुरीचा गोदावरी वाण महाराष्ट्रामध्ये क्रांती करत आहे. या वाणापासून साधारणपणे एकरी १२ क्विंटल आणि एक लाख रुपयापर्यंत शेतकरी उत्पन्न घेत असल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हा वाणाद्वारे २०२६ नंतर दाळ आयात थांबण्यासाठी हे लाभदायक ठरणार आहे. विद्यापीठशेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करत असून सीएसआर फंडातून अनेक उपक्रम राबवत आहे.  शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र मेकॅनिझेशन सेंटर, शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. याबरोबरच वनविभागाच्या मदतीने विद्यापीठामध्ये साडेचार किलोमीटर लांब आणि ५० मीटर रुंद अंतराची वृक्षांची प्रामुख्याने फळ पिकांची यशस्वी लागवड केली असून कोरडवाहू शेतीचे यशस्वी व्यवस्थापन विद्यापीठ करत असल्याचे प्रतिपादन केले.

मुख्य अतिथी उप-महासंचालक मा. डॉ. सुरेश कुमार चौधरी म्हणाले की, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाद्वारे पावसाच्या पाण्याचे संकलन, संवर्धन आणि साठवणुकीसाठी विकसित तंत्रज्ञानाद्वारे कोरडवाहू शेती विकास साधला जात असून त्याची चांगली फळे मिळत आहेत. हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमाच्या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाचा विकास साधण्यासही मदत झाली. मराठवाड्यातील बहुतांश शेती कमी पर्जन्यमान आणि कोरडवाहू आहे. यासाठी रुंद सरी वरंबा, यांत्रिकीकरण, शेततळे या बाबी महत्त्वाचे आहेत. देशाचे ५० टक्के उत्पादन कोरडवाहू शेती आणि संलग्न व्यवसाय मधून येते. परंतु कोरडवाहू शेतीमध्ये अनेक अडचणी उद्भवतात. बैठकीमध्ये विचार मंथन करून अडचणीवर मात करण्यासाठी संधी शोधाव्या लागतील. हायड्रोफोनिक, पॉलिहाऊस सारखे उपयुक्त तंत्रज्ञान देवून अचूक शेती करावी लागेल. महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र हा विभाग सहाव्या झोनमध्ये येत असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०० मिलिमीटर असून देखील, पाण्याचा योग्य वापरामुळे पश्चिम महाराष्ट्राचा आदर्श मराठवाड्यासह संपूर्ण देशात घेतला जातो. याचे अनुकरण करून यासाठी आवश्यक असलेले संशोधन करावे लागेल आणि हीच खरी या बैठकीची उपलब्धी असेल असे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे यशापेक्षा अपयश शोधून अपयशाची कारणे यावर संशोधन करून पुढे त्यांना यशस्वी करणे महत्त्वाचे आहे. ऊर्जेची बचत, योग्य वापर, मशागतीतून अन्नद्रव्याचा आणि पाण्याचा पुरेपूर उपयोग होऊन कोरडवाहू शेती विकासास लाभदायक ठरेल अशा तंत्रज्ञानाची आणि अवजारांची गरज आहे. अशी अवजारे विकसित होत असून त्याची कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवावा लागेल असेही नमूद केले.

क्रीडा (CRIDA)चे संचालक डॉ. व्ही. के. सिंग यांनी बैठकीत सिंचन व्यवस्थापन, रुंद सरी वरंबा यासह कोरडवाहू शेतीस उपयुक्त तंत्रज्ञावर होणाऱ्या चर्चेच्या विषयांची माहिती दिली. सिंचन व्यवस्थापन योजनेद्वारे विकसित सर्व तंत्रज्ञान शासनाच्या योजनेची सुसंगत असावेत असे मागील बैठकी सुचित केले होते. त्याप्रमाणे ड्रोनचा वापर, पीक पद्धती, उर्जा बचतीची साधने, अन्नद्रव्य, जमीन, पाणी व्यवस्थापन, यावर संशोधन करून शिफारशी देण्याचे कार्य चालू असल्याचे सांगितले. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतीवर कार्य करण्यासाठी तीन प्रकल्प तसेच ऍग्रो मेट्रोलॉजी आणि निकरा यांचेही प्रकल्प कार्य करत असून देशात महाराष्ट्राचे कार्य अग्रगणी असल्याचे असे स्पष्ट केले.

संचालक डॉ. सुनील कुमार यांनी वातावरण बदलामुळे कोरडवाहू शेतीसाठी भविष्यात येणाऱ्या अडचणीवर या चर्चेतून उपाय शोधण्यात येऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळेल. दोन्ही संस्थाचे कोरडवाहू शेती विकासाबरोबरच सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती साठी महत्वाचे कार्य करत आहेत. तंत्रज्ञानाची बँक तयार केली जात असून तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यामध्ये मधील अंतर कमी करून पोहोचवण्याचे ही कार्य करत आहे. या करिता सामाजिक सहभाग देखील महत्त्वाचा निकराप्रकल्पातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नमूद केले.

प्रकल्पाचे समन्वयक जे.व्ही.एन.एस. प्रसाद प्रकल्पाचा २०२३ चा अहवाल आणि योजनेद्वारे मिळालेले यश सादर करून प्रकल्पाचे कार्य प्रकाशनाची माहिती दिलीसंशोधन संचालक डॉ खिजर बेग यांनी प्रास्ताविकात विद्यापीठ स्थापनेचे उद्देश आणि कार्यक्षेत्राची ओळख करून दिली. याबरोबरच मराठवाड्यातील प्रमुख पिके, जमीन, वातावरण, सिंचन सुविधा आणि विद्यापीठाने विकसित केलेले वाण, तंत्रज्ञान आणि बिजोत्पादानाची माहिती दिलीयावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी शास्त्रज्ञ उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध अहवालांचे आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पुढील दोन महिन्यात नियत वयोमानुसार डॉ. सुरेश कुमार चौधरी हे निवृत्त होत असल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. सूत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी तर आभार मुख्य शास्त्रज्ञ डॉ वासुदेव नारखेडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कुलगुरु माननीय प्रा.(डॉ.) इन्द्र मणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे  मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे तसेच प्रकल्पातील शास्त्रज्ञ, डॉ आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके, डॉ. पापिता गौरखेडे, डॉ गणेश गायकवाड, डॉ. रावसाहेब राऊत यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


उप-महासंचालक माडॉसुरेश कुमार चौधरी