Sunday, January 12, 2025

अन्नतंत्र महाविद्यालयात अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन कार्यशाळेचा सांगता आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

प्रयत्नानेच कामे पूर्ण होतात,केवळ इच्छेने किंवा स्वप्नांनी नाही... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयात दिनांक ६ ते १० जानेवारी या कालावधीमध्ये अन्नप्रक्रिया मूल्यवर्धन या विषयावर विविध पाच राज्यातून प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २५ सहभागी कृषी उद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेचा सांगता समारोह प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम दिनांक १० जानेवारी रोजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना अन्नप्रक्रिया प्रक्रिया उद्योग उभारणी करिता शुभेच्छा देत कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उद्योजक बनण्यासाठी आवश्यक गुणांबद्दल मार्गदर्शन केले. ज्यामध्ये सचोटी, विश्वास, आर्थिक व्यवस्थापन कौशल्य, जोखीम घेण्याची तयारी, नेतृत्व गुणाबरोबरच सर्वांना सोबत घेऊन चालणे, सकारात्मक दृष्टिकोन, नम्रता इत्यादी गुणांबद्दल माहिती दिली. याप्रसंगी "उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः" या संस्कृत वचनाचा आधार घेतला. याचा मराठी अर्थ असा आहे की, "प्रयत्नानेच कामे पूर्ण होतात, केवळ इच्छेने किंवा स्वप्नांनी नाही,” म्हणजेच फक्त विचार करणं किंवा स्वप्ने पाहणं पुरेसं नाही,तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, कृती करावी लागते, असे प्रतिपादन केले.  

प्रस्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी पाच दिवसीय कार्यशाळेबद्दल माहिती दिली.

यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी या पाच दिवसीय प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत झालेल्या प्रशिक्षणाचा त्यांना मोठ्या प्रमाणावर ज्ञान आणि कौश्यल्य विकास साधण्यात उपयोग झाला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग चालू करण्याबाबत प्रशिक्षणार्थींनी आश्वासन दिले आणि आयोजकांचे आभार मानले.

कार्यशाळेच्या समन्वयक डॉ.अनुप्रिता जोशी यांनी सूत्रसंचालन तथा आभार व्यक्त केले.

यावेळी डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. के एस गाडे, डॉ. व्ही डी सुर्वे, डॉ. भारत आगरकर, डॉ. स्मिता सोळंकी यांच्यासह महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते.