गोगलगायीच्या व्यवस्थापनाकरिता डॉ झंवर यांचे उल्लेखनीय कार्य... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर हे ३४ वर्ष विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्त कृषि महाविद्यालयाच्या वतीने दिनांक ३० डिसेंबर रोजी त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित केला. अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी मृद व जलसंधारणचे माजी सचिव तथा कृषी विभागाचे माजी आयुक्त मा. श्री सुनील चव्हाण (भा.प्र.से.) हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री कामाजी पवार, सत्कारमूर्तीं यांची पत्नी सौ तनुजा झंवर आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी, डॉ झंवर यांच्या विद्यापीठातील सेवा आणि कार्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी निस्पृह, निष्कलंक आणि चारित्र्य पूर्ण सेवा केली. विद्यार्थी-शेतकरी यांच्या प्रती उत्तम कार्य केले. कपाशीवरील गुलाबी बोंड अळी आणि खरीप २०२२ मधील गोगलगायीच्या व्यवस्थापनाकरिता त्यांनी केलेल्या उल्लेखनीय संशोधन आणि विस्तार कार्यामुळे विद्यापीठाची शासन स्तरावर नोंद घेण्यात आल्याचे माननीय कुलगुरू यांनी सांगितले. याबरोबरच विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रामार्फत डॉ. झंवर यांनी विद्यार्थ्यां प्रती केलेल्या विशेष कार्याचा विवेचन केले.
प्रमुख अतिथी मृद व जलसंधारण माजी सचिव तथा कृषी विभागाचे माजी आयुक्त मा. श्री सुनील चव्हाण (भा.प्र.से.) यांनी विद्यार्थी, शेतकरी आणि मित्रपरिवार यांच्याकरिता डॉ. झंवर यांनी केलेल्या विशेष बाबींचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, विद्यापीठ परिसरात मुलाखतींचे आयोजन, शासन दरबारी संसाधन व्यक्ती म्हणून आणि कृषी विभागाचा समन्वय अधिकारी म्हणून डॉ. झंवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले. गोगलगाय व्यवस्थापनाकरिता डॉ. झंवर यांनी राज्यस्तरीय समितीचे तज्ञ सदस्य म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री कामाजी पवार म्हणाले की, डॉ. झंवर यांनी कृषी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्रित ठेवण्याचे कठीण कार्य आणि त्याकरिता केलेल्या विविध मेळाव्याबद्दल माहिती दिली. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी त्यांच्या विद्यापीठातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील उत्कृष्ट सहभागाबद्दल प्रशंसा केली. कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी डॉ. झंवर यांचे नियत वयोमानुसार सेवापूर्तीबद्दल अभिनंदन केले. शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि विद्यार्थी यांच्या उत्कृष्ट समन्वय साधणारे विद्यापीठाचे अधिकारी म्हणून त्यांचे नावलौकिक असल्याचे नमूद केले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी डॉ. झंवर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून विद्यापीठासाठी त्यांनी दिलेल्या विविध कार्याचा परिचय प्रस्ताविकात केला. सूत्रसंचालन डॉ. रणजीत चव्हाण आणि डॉ. अनुराधा लाड यांनी केले कार्यक्रमास डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. नरंगलकर यांच्यासह या विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि डॉ. झंवर यांचा मित्रपरिवारासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.