Wednesday, January 15, 2025

पीक उत्पादनात व्यवस्थापन प्रणालीचे अनन्यसाधारण महत्व … कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण संवाद मालिकेचा ३१ वा भाग कांदा पीक व्यवस्थापन या विषयावर मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, , महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी वरीष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. मधुकर भालेकर, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, डॉ. मीनाक्षी पाटील, श्रीमती सारीका नारळे आदीची उपस्थिती होती.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कांदा हे सर्व हंगामातील पीक असून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी पिकाचे वेळेवर व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता आणि दररोजच्या बदलत्या हवामानानुसार विचार करून नवनवीन तंत्रज्ञानाचा, यांत्रिकीकरणाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते. प्रत्येक पिकाला त्याच्या वेळेनुसार खते देणे, पाणी देणे, आंतर मशागत करणे, फवारण्या करणे या सर्व गोष्टी वेळेवरचा झाल्या तर पिकाचे योग्य व्यवस्थापन होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले. एकूणच पिकांच्या अधिक उत्पादनात व्यवस्थापनाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

प्रमुख वक्ते डॉ. मधुकर भालेकर यांनी त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रात कांदा पिकाचे हंगाम, जमिनीनुसार हंगामानुसार उपयुक्त वाण, विविध लागवड पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले. कांदा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी हंगामातील वेळेवर लागवड, योग्य वाणाची निवड, लागवड अंतर, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन आणि साठवण बाजारपेठ व्यवस्थापन या अष्टकाची अंमलबजावणी करावी असे सांगितले.

दोन तास चाललेल्या कार्यक्रमात शेतकरी बंधु-भगिणी यांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद नोंदवून तंत्रज्ञान आत्मसात केले. याबरोबरच पुढे प्रश्ननोत्तरे च्या कार्यक्रमात शेतकरी बंधु-भगिणी यांनी कांदा पीकाच्या लागवडी, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, रोगांचे नियंत्रण, कांदा प्रक्रिया, कांदा साठवण इत्यादी अडचणी संबंधी प्रश्न विचारले यास शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे, सुत्रसंचालन आभार प्रदर्शन श्रीमती सारीका नारळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मिटींग, युट्यूब चॅनल, फेसबुक या सामाजिक माध्यामाद्वारे करण्यात आले.