Sunday, January 26, 2025

वनामकृविच्या १०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा शुभारंभ – कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्र हा प्रकल्प विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रातील १०० हेक्टर पडीक जमिनीवर फळबाग लागवडीसाठी सुरू करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते आंबा फळझाड कलमे रोपणाने करण्यात आला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत आंब्याचे भारतीय व विदेशी ६० वाण, ॲव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूट, बेल, आवळा, जांभूळ  या फळझाडांच्या विविध जातींची लागवड करण्यात येणार आहे. या फळझाडांच्या लागवडीसाठी डॉ विश्वनाथ खंदारे यांनी लखनौ, बंगळूर,अयोध्या, संघरेडी, दापोली, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणांहून चाळीस हजारांहून अधिक कलमे/ रोपे आणली आहेत.

उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्र हे आंबा व कोरडवाहू फळांच्या संशोधनासाठी तसेच केशर आंबा रोपवाटिका,गावरान आंब्याचे संवर्धन आणि इतर फळ संशोधनासाठी  महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय निर्यातक्षम फळ उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या एमएस्सी,पीएच. डी. विद्यार्थ्यांसाठी या फळबागेत अभ्यास व संशोधन प्रकल्प दिले जातील. शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या प्रयोगांद्वारे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शिफारशी तयार केल्या जातील.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा सत्कार केला आणि समर्पण भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.

प्रकल्पाचे नेतृत्व करणारे डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी या प्रकल्पाद्वारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील,असा विश्वास व्यक्त केला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि माननीय संचालक संशोधन डॉ खिजर बेग यांचे मार्गदर्शन नुसार प्रकल्पाचे काम चालणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातक्षम फळ उत्पादनाचा एक नवा मार्ग सुरू होईल,असेही ते म्हणाले.  विभागाचे डॉ. संतोष बरकुले, डॉ. राहुल बगीले, डॉ. वैशाली भगतडॉ. लोहकरे , पांचाळ, माणिक ढगे, तसेच विद्यार्थी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.