वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्र मार्फत करडई उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचे दिनांक ३१ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ प्रवीण कापसे आदी उपस्थित होते. या भेटी दरम्यान मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री वसंतराव लाड यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या ४० एकर करडईचे पीकाची पाहणी त्यांच्या उपस्थितीत माननीय कुलगुरू यांनी केली. श्री वसंतराव लाड हे प्रतिवर्षी अंदाजे ४० ते ५० एकर करडई पिकाची पेरणी करतात. करडई संशोधन केंद्रद्वारे प्रसारित वाण पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाची त्यांनी पेरणी केली असून हे दोन्ही वाण मराठवाडा विभागात लोकप्रिय झाले आहेत. या वाणांमधील तेलाचे प्रमाण ३० टक्के असून उत्पादन बागायती मध्ये १८ ते २० क्विंटल तर कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. करडई पिकासाठी लागवडीचा खर्च कमी असून कोरडवाहू किंवा एक ते दोन पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती पीक घेतले जाते.
या भेटी दरम्यान माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, करडई पिकास फवारणी, काढणी व मळणी यंत्राच्या साह्याने होत असल्याने काढणी कारणे अवघड असल्याची या पिकाविषयीची धारणा बदलेली आहे. करडईचे तेल सर्वोच्च दर्जाचे असून त्यास चांगला बाजार भाव देखील मिळत आहे. विशेष करून या पिकास पशुधनापासून तसेच जंगली प्राण्यापासून धोका उद्भवत नाही. याबरोबरच वाढते यांत्रिकीकरण यामुळे करडई या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांना या पिकाचे गुणवत्ता युक्त बियाणे आणि आवश्यक तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर आहे. यामुळे करडई सारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे नमूद केले.
प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यासाठी करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. आर आर धुतमल आणि कृषि विद्यावेत्ता डॉ. एस. ए. शिंदे यांनी पुढाकार घेतला.