Wednesday, January 8, 2025

वनामकृविमध्ये कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांच्या बैठकीचा यशस्वी समारोप

 कृषी-फलोत्पादन-पशुपालन यांची सांगड महत्वाची...कुलगुरु मा.प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे दिनांक ०६ ते ०८ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाची १९व्या आणि हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमाची १२व्या राष्ट्रीय वार्षीक आढावा बैठकीचा यशस्वी समारोप दिनांक ०८ जानेवारी रोजी झाला.

अध्यक्षस्थानी कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि हे होते. मुख्य अतिथी म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. के पी गोरे आणि सन्माननीय अतिथी माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे होते. व्यासपीठावर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी प्रमुख डॉ. वेणूगोपालन, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील भारतीय संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. के रमेश, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जे.व्ही.एन.एस.प्रसाद,संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि  कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे आदींची उपस्थिती होती.

बैठकीत अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या १९ शिफारशी तर हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमाच्या शिफारशी देण्यात आल्या.याचे सदरीकरण क्रीडा (CRIDA) चे मुख्य शास्त्रज्ञ  डॉ. के. गोपीनाथ यांनी केले. या शिफारशी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेस मंजुरीसाठी सादर केल्या जाणार असून या शिफारशींची चाचणी देशातील विविध ठिकाणच्या संशोधन केंद्राव्द्वारे केली जाणार आहे.  

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेती उत्पादनासाठी पाण्याचा न्यायिक पद्धतीने उपयोग महत्वाचा असून कोरडवाहू शेतीमध्ये रबी आणि उन्हाळी हंगामात शेततळ्याचे अनन्य साधारण महत्व आहे. याबरोबरच कोरडवाहू शेतीतून तसेच  नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा जमिनीत पेरलेल्या बियाण्याची रक्कमेचा परतावा देखील मिळत नाही. शेती व्यवसायातील जोखीम आणि खर्च व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी आंतरपीक पद्धती, एकात्मिक शेती पद्धती तसेच कृषी-फलोत्पादन-पशुपालन याची सांगड घालावी लागेल. शेतकऱ्यांना शेतीमधून किती नफा मिळतो याचा देखील संशोधन करताना विचार करणे आवश्यक आहे. संशोधन केंद्राने दिलेल्या संशोधनाचा प्रभावी परिणाम आणि समांतर प्रसारण महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शास्वत शेतीसाठी स्वतः शेतीमध्ये उभे राहून शेती करणे महत्त्वाचे आहे. यातून त्यांना शेती व्यवसायाचे मूल्यांकन देखील करता येतेविद्यापीठशेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करत असून विविध विस्तार कार्याच्या माध्यमातून नियमित शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. असे नमूद करून त्यांनी शेतीच्या उज्वल भविष्यासाठी कृषी आणि संलग्न विभागातील सर्व शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या नियमित संपर्कात राहावे एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. के पी गोरे म्हणाले दिवसेंदिवस जमिनीची प्रत खालावत चाललेली असून यामध्ये सुधार करणे आवश्यक आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि मातीचे  नुकसान दिवसेंदिवस होत आहे. भविष्यात एकूण जमिनीच्या तिसरा भाग शेती करण्यास योग्य राहणार नसल्याची शक्यता आहे. यासाठी मृद जल संधारण केंद्रस्थानी ठेऊन संशोधन कार्यक्रम आखावा लागेल. यासोबतच हवामान बदलामुळे जमीन आणि पिकांच्या उत्पादन क्षमते वरती परिणाम होत आहे. यामुळे सध्या उपयोगात असलेल्या तंत्रज्ञानामध्ये सुधार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी बहुविद्याशाखीय दृष्टीकोन समोर ठेवून भविष्यात कार्य करावे लागेल असे प्रतिपादन केले. माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी कोरडवाहू शेती संशोधनांमध्ये संपूर्ण भारतातील संशोधन केंद्रामध्ये प्रामुख्याने तरुण शास्त्रज्ञ असल्यामुळे भविष्यात कोरडवाहूसाठी उत्कृष्ट संशोधन होईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी त्यांनी बैठकीमधील महत्त्वाच्या शिफारशीवर टिप्पणी करून कोरडवाहू किंवा ओलिताखालील शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे असे सांगितले आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, त्याचे संकलन, संवर्धन,पुनर्भरण आणि साठवणुकीचे तंत्रज्ञानाचा पुरेपूर अवलंब शेतकऱ्यांनी करावा लागेल असे नमूद केले.

प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जे.व्ही.एन.एस.प्रसाद यांनी अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम उपक्रमांचा अहवाल आणि कार्य सादर केले याबरोबरच या दोन्ही प्रकल्पाद्वारे सिंचन सुविधा वाढवण्यासाठी विविध तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे नमूद केले.

डॉ. वेणूगोपालन म्हणाले की, हवामान बदलानुरूप शेती आणि पुनरुत्पादक शेती या दोन बाबी शेतीसंबंधी महत्त्वाच्या आहेत. याचा सर्व स्तरावरून उल्लेख केला जातो. या दोन बाबीवरच प्रामुख्याने कोरडवाहूसह सिंचित शेतीमध्येही संशोधन करून योग्य शिफारशी देणे महत्त्वाचे आहेयासाठी तसेच पुढील पाच वर्षातील कार्य करण्यासाठी या बैठकीमधून प्राप्त शिफारशी लाभदायक ठरणार असल्याचे नमूद केले. डॉ. के रमेश यांना कोरडवाहू क्षेत्रात कार्य करणारे शास्त्रज्ञांची कार्य कौतुकास्पद असल्याचे बैठकीत जाणवले. शास्त्रज्ञ कोरडवाहू शेतीमध्ये एकादया डॉक्टर प्रमाणे योग्य वेळेस सल्ला देतात. याचा कोरडवाहू शेती विकास साधण्यास मदत मिळत असून कोरडवाहू शेती क्षेत्रात काम करण्यासाठी मोठा वाव आहे असे नमूद केले.

यावेळी बैठकीच्या आयोजन आणि दरम्यान च्या राहण्याची जेवणाची वाहतुकीची व्यवस्थेबाबत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे उप-महासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग यांनी संदेश पाठवून तर डॉ. आरबार, डॉ. के पी सिंग, डॉ. मदनगिरी आप्पा, डॉ. निमा, डॉ. अनिता यांनी कार्यक्रमात समाधान व्यक्त केले आणि माननीय कुलगुरू प्रा (डॉ) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखालील आयोजक डॉ वासुदेव नारखेडे आणि चमूचे अभिनंदन करून आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांनी केले तर परभणी येथील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाची माहिती मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी दिली. सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे, यांनी तर आभार हैदराबाद येथील क्रीडा (CRIDA)चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. बी नर्सीम्लू यांनी मानले.

बैठक यशस्वीतेकरीता कुलगुरु माननीय प्रा.(डॉ.) इन्द्र मणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे तसेच प्रकल्पातील शास्त्रज्ञ, डॉ आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ गणेश गायकवाड, डॉ. रावसाहेब राऊत यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर विविध समित्यांचे अध्यक्ष सदस्य यांनी आयोजनात मोठा सहभाग घेतला.