आर्थिक लाभातुनच शेतकरी उन्नती साधू शकेल...माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा सत्ताविसावा भाग कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
यावेळी बोलताना कुलगुरू मा प्रा. (डॉ)
इन्द्र मणि म्हणाले की, मागील दोन दिवसात मराठवाड्यातील लातूर, बदनापूर, पैठण,
गेवराई या ठिकाणी शेतकरी मेळावे आणि प्रक्षेत्र भेटीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या
सर्व ठिकाणी विद्यापीठाने प्रसारित केलेले तंत्रज्ञानाचे आणि विविध पिकांच्या वाणाचे
अवलंबन केलेले शेतकरी उत्स्फूर्तपणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचे आणि वाणाचे कौतुक
करून आभार मानत होते. दिनांक ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या
जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या खामगाव (ता. गेवराई) येथील कृषी विज्ञान केंद्र
केंद्रामध्ये आयोजित महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात
जवळपास ७०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष करून या मेळाव्याच्या प्रमुख
मार्गदर्शिका या महिलाच होत्या. त्यांनी त्यांच्या यशोगाथा या मेळाव्यात
सांगितल्या, ते ऐकून मन प्रसन्न झाले, त्यांच्या कार्याचे कौतुक वाटले. सध्या
महिला खऱ्या अर्थाने सबलीकरण होताना दिसत आहेत. या महिलांनी प्रक्रिया उद्योग
उभारणीपासून ते विक्री व्यवस्थापनाबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या
महिलांच्या सबलीकरणासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग विविध स्वयंसेवी
संस्था, शेतकरी गट यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले
की, सध्या वातावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला
तरच त्यांची उन्नती साधू शकेल. याकरिता शेतीमध्ये जैवविविधता, ड्रोन, यांत्रिकीकरणाचा
वापर यासारख्या विविध उपाय योजना कराव्या लागतील. गुणवत्ता युक्त उत्पादने,
त्यांचे पॅकेजिंग, विक्री व्यवस्थापन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे लागतील.
शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमात शेतकरी आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञांची
रुची वाढत असून सर्व आवडीने सहभागी होतात याबद्दल मा. कुलगुरुनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमातून
सहभागींना ऊर्जा देण्यासह मलाही उर्जा मिळते, असे प्रतिपादन केले.