वनामकृवित उमेद-महिला बचत गट उत्पादन जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जिल्हा परिषद, ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या शेतकरी भवन परिसरात “महिला स्वयं सहायता समूह उत्पादित उत्पादनांचे जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे व खाद्य महोत्सवाचे” उद्घाटन कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री सम्राट उपस्थित होते. हा महोत्सव १ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांसाठी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान खुला राहणार आहे.
उद्घाटन समारंभात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महिलांच्या आर्थिक नियोजन कौशल्याचे कौतुक करताना सांगितले की,
महिलाच सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु आहेत. कुटुंबातील आर्थिक व्यवहार महिलांच्या खंबीर नियोजनामुळे सहजतेने सांभाळले जातात. दोन वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील शासकीय नेतृत्व महिलांच्या हाती होते,
ज्यामध्ये जिल्हाधिकारी,
पोलीस अधीक्षक,
आयुक्त व विद्यापीठाच्या नियंत्रक यांचा समावेश होता. विद्यापीठाने महिलादिनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. आजच्या या प्रदर्शनातून महिला भविष्यात मोठ्या उद्योजक म्हणून पुढे येतील याची खात्री आहे. महिला बचत गटांनी सादर केलेल्या उत्पादनांचे निरीक्षण करताना माननीय कुलगुरूंनी त्यांना उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठाच्या सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री दिपक दहे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ गजानन गडदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महिला बचत गट आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव ग्रामीण भागातील महिलांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे.