Friday, January 31, 2025

वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार हे 'आयएसडीए फेलो' म्हणून सन्मानित

 माननीय कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन

कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर अभिनंदन करताना



मान्यवरांच्या शुभहस्ते ‘आयएसडीए फेलो’ प्रदान 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या कोरडवाहू शेतीसाठी मागील दहा वर्षात तंत्रज्ञान संशोधन आणि त्याच्या प्रसारातून साधलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना भारतीय कोरडवाहू शेती संस्थेद्वारे देण्यात येत असलेला राष्ट्रीय पातळीवर बहुमान ‘आयएसडीए फेलो’ म्हणून वर्ष २०२३ साठी सन्मानित केले. सदरील बहुमान भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था येथे भारतीय कोरडवाहू शेती संस्थेद्वारे दिनांक २९ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दिनांक २९ जानेवारी रोजी देण्यात आला. हा बहुमान त्यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेचे महासंचालक तथा कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव मा डॉ. हिमांशु पाठक, आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क कटिबंधीय पिक संशोधन संस्थेचे (ICRISAT) महासंचालक मा. डॉ. स्टॅन ब्लेड, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनचे  (NRM)उपमहासंचालक मा. डॉ. एस के चौधरीकेंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे (CRIDA) संचालक डॉ. व्ही के सिंह यांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला.

या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्रीप्रवीण देशमुख,  विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे उपस्थित होते.

डॉ. भगवान आसेवार यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्काराने २०१९ मध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना यापूर्वी राष्ट्रीय व राज्य पातळीवर केलेल्या कामाच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय कृषि विद्या सोसायटी आयएआरआय नवी दिल्ली या सोसायटीचे  फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले होते. अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामान बदल, कोरडवाहू शेती, आंतरपीक पद्धती मुख्यतः सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धत, बागायती बीटी कापसासाठी लागवडीचे अंतर, खताची मात्रा आदी विषयावर संशोधन करून शिफारशी देण्यात डॉ. भगवान आसेवार यांचे मोलाचे योगदान आहे. मराठवाडयातील आठही जिल्ह्यासाठी हवामान बद्लानुरूप आकस्मिक योजना आराखडा तयार करणे तसेच हवामान बदल, कोरडवाहू शेती, दुष्काळाचे व्यवस्थापन याविषयावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्‍यांनी राबविले आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञास मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञामध्ये चैतन्य जागृत झाले. या त्यांच्या यशाबद्दल संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.