Saturday, January 11, 2025

शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी वनामकृविच्या ऑनलाईन संवादाचा लाभ घ्यावा... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा अठ्ठावीसावा भाग कुलगुरू मा प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० जानेवारी रोजी संपन्न झाला.

यावेळी विद्यापीठाच्या विस्तार कार्यात नियमितपणे सहभागी असलेले नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सायळ या गावचे श्री रत्नाकर गंगाधरराव ढगे  यांना दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया यांचेतर्फे विशेष  आमंत्रित करण्यात आले असल्यामुळे  कुलगुरु मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांनी अभिनंदन केले आणि पुढे म्हणाले की, ढगे यांच्या राष्ट्रपती भवनातील आमंत्रण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब असून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळून शेती व्यवसायात कार्य करण्यासाठी उर्जा देईल. सद्यस्थितीत  मराठवाड्यामध्ये होणाऱ्या हवामानामध्ये बदलामुळे शकतो, पिकांचे आणि पशुधनाचे योग्य पद्धतीने संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. म्हणून शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादातून केवळ शंका समाधानावरच भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेती समस्या सोडवण्यासाठी या ऑनलाईन संवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे म्हणाले की, सध्या हरभरा पिकावरील किड नियंत्रण, आंबा मोहोर संरक्षण यासह हवामान बदलानुसार पिके , फळपिके , पशुधनाची यांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शिफारशीनुसार आणि तज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार पद्धती अवलंबावी. यामुळे खर्चात बचत होवून योग्य नियंत्रण साधता येईल असे नमूद केले.

यावेळी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह सोलापूर येथून शेतकऱ्यांचा सहभाग होता.

सहभागी शेतकरी यांनीही श्री रत्नाकर ढगे यांचे अभिनंदन केले. तसेच विविध पिकावर जाणवणाऱ्या समस्या नमूद केल्या. त्यास विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. अंबाडकर, डॉ. अनंत लाड, यांनी समाधानकारक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.