Saturday, January 25, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साह

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी रोजी, भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इंद्र मणि, अमेरिकेतील परडयू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सारस्वत, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, तसेच डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. विश्वनाथ खंदारे आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इंद्र मणि म्हणाले की, मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी,  मनशांती, समाधानासाठी आणि आनंदी राहण्यासाठी संगीताची आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण देवून चालणार नाही, तर त्यांच्या कलागुणांना वाव देणेही अत्यंत आवश्यक आहे. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो, टीमवर्कची भावना विकसित होते, आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळते. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. यातून देश प्रेमाची भावना जागृत करून  सांस्कृतिक वारशाचा सन्मान देखील केला. प्रजासत्ताक दिन हा सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून एकतेचा संदेश प्रभावीपणे दिला जातो. कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना मनोरंजनासोबत प्रेरणादायी संदेश दिला जातो, ज्यामुळे ते सकारात्मक उर्जेने भारावून जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून, ते एक सामाजिक आणि राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करणारे साधन आहे. देशप्रेम, सांस्कृतिक वारसा, आणि एकतेचा संदेश देण्यासाठी याचे महत्व अमूल्य आहे, असे नमूद केले आणि त्यांनी आयोजकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले,

कार्यक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूह गायन, शुगम गायन, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. परभणी शहरातील स्टार गायक श्री. संतोष कुलकर्णी (कुमार शानू आणि किशोर कुमार फेम) आणि सुरेल गायक श्री. प्रवीणकुमार कांबळे यांनी सादर केलेल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

प्रत्येक महाविद्यालयाच्या किमान तीन संघांनी सहभाग नोंदविला, ज्यामुळे कार्यक्रमात विविधतेचा सुंदर संगम दिसून आला. देशभक्तीपर गीतांनी सभागृह उत्साहाने भरले आणि प्रेक्षकांमध्ये देशप्रेम जागवले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नीता गायकवाड, डॉ. नरेंद्र कांबळे, श्री. डी. एस. राठोड, आणि श्री. एस. यू. चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला भव्य यश मिळवून दिले.