विद्यापीठ ‘शेतकरी देव भव:’ या भावनेतून कार्य करते… कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत' हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविण्यात येतो. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले जाते. यावेळी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह एकूण १२ चमूमधिल ३५ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास ४५० शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेवून त्यास समाधानकारक उत्तरे देवून विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मौजे वाला (ता. बदनापूर) येथे शेतकऱ्यांसोबत आपला दिवस व्यतित केला त्यांच्या समवेत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पचे सहयोगी संचालक संशोधन तथा कृषी विद्यावेता डॉ. एस. बी. पवार, बदनापूरच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. डी. अहिरे, कृषी संशोधन केंद्राचे तूर पैदासकार तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. के. पाटील आदी उपस्थित होते
माननीय कुलगुरू यांनी बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतीमध्ये कार्य करत असताना मजुरीचा तुटवडा जाणवतो, यावर उपाय म्हणून यांत्रिकीकरणाची जोड शेतकऱ्यांनी द्यावी लागेल. तसेच शेतकऱ्यांना यांत्रिकी शेतीचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांच्या हस्ते शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यापीठ ‘शेतकरी देव भव:’ या भावनेतून कार्य करते असे ही नमूद केले. यानंतर मौजे वाला येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर विद्यापीठ विकसित तुरीचा गोदावरी वाणाच्या प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू यांच्या समवेत सर्व शास्त्रज्ञांनी भेट दिली.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर शास्त्रज्ञानी हवामानातील बदलामुळे तुर, हरभरा या पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी तसेच आंबा मोहराच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन केले. तसेच खरीप हंगामामध्ये विद्यापीठ विकसित तूर पिकातील गोदावरी या जातीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. गोदावरी वाणापासून या वाणाच्या शेंगांमध्ये चार ते पाच दाणे असून मर रोगास बळी पडत नाही. गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळते. शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे सांगितले. या वाणाद्वारे शेतकऱ्यांना साधारणपणे एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त होत आहे. शेतकरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा विकसित तुरीच्या गोदावरी वाणाद्वारे ऊसाला पर्यायी पीक म्हणून पाहत आहेत.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा कार्यक्रम अतिशय लाभदायक ठरत असल्याच्या भावना अनेक ठिकाणच्या शेतकरी वर्गामधून दिल्या जात होत्या. हा कार्यक्रम अधिक अधिक प्रभावी व्हावा, यासाठी शेतकऱ्यातून शास्त्रज्ञांना योग्य असे सहभाग नोंदवण्याचे आश्वासन बहुतांश ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिले. या कार्यक्रमातून शेती करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचेही शेतकरी नमूद करत होते.