वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी तसेच जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. श्री. चैत्रामजी पवार यांचा नागरी सत्कार व प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात दिनांक ०९ एप्रिल रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि भूषण श्री कांतरावकाका देशमुख झरीकर,
श्री हरीश कुलकर्णी, श्री सतीश देशमुख तसेच
परभणीचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रामेश्वर नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पद्मश्री चैत्रामजी पवार यांच्या
कार्याचा गौरव करत विज्ञानवादी विचारसरणीला चालना देणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा
केली. त्यांनी सांगितले की,
परभणी अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त
प्रयत्नातून विज्ञानप्रिय समाज घडवण्याचे कार्य भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात
राबवले जाईल. डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात या कार्यास नवी दिशा मिळेल.
पद्मश्री चैत्रामजी पवार
यांची प्रकट मुलाखत डॉ. जगदीश नाईक आणि श्री विजय नरवाडे यांनी घेतली. यामध्ये मा.
चैत्रामजी पवार यांनी जंगल क्षेत्रात वृक्षतोडीला आळा घालण्याच्या उपाययोजना, स्थानिक
युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी, तसेच “जन, जमीन, जल, जंगल आणि जनावरे” या
पंचसूत्री तत्वावर आधारित आपल्या कार्याचा सविस्तर आढावा दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक
डॉ. के. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला परभणी शहरातील विविध क्षेत्रातील
मान्यवर, नागरिक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम समाजसुधारणेच्या दिशेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारा ठरला असून, विज्ञान आणि सामाजिक विकास यांचा समन्वय साधणारी ही पर्वणी नागरिकांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली.