Thursday, April 3, 2025

वनामकृविच्या नांदेड कापूस संशोधन केंद्राला ‘सर्वोत्कृष्ट एआयसीआरपी केंद्र’ पुरस्कार


माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) - कापूस अंतर्गत सर्वोत्कृष्ट एआयसीआरपी केंद्र’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR), नागपूर यांच्याद्वारे या गौरवप्राप्त केंद्राला "उत्कृष्टता प्रमाणपत्र" प्रदान करण्यात आले आहे.

२०१८ ते २०२३ या कालावधीत कापूस संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी पंचवार्षिक पुनरावलोकन समिती (QRT) ने मूल्यमापन करून हा पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केली होती. नांदेड कापूस संशोधन केंद्राने या काळात उच्च दर्जाचे संशोधन व कृषी क्षेत्रात नव्याने योगदान दिल्याचे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे नांदेड केंद्राच्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केंद्रातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या केंद्रास माननीय कुलगुरूंचे नियमित मार्गदर्शन, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे सक्षम नेतृत्व आणि विद्यापीठातील सर्व अधिकारी, संशोधक व संपूर्ण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिवाराचे योगदान याबद्दल कापूस संशोधन केंद्राच्या वतीने विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने भविष्यातील कापूस संशोधन व उत्पादन क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. या यशामुळे शेतकरी व संशोधन क्षेत्राच्या विकासासठी नवे द्वार खुले झाले आहे. यामुळे विद्यापीठामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण संशोधन चमूचे मनःपूर्वक अभिनंदन केले.