अयोध्या येथे दिनांक २ मे २०२५ ते ४ मे २०२५ या कालावधीत कुमारगंज येथील आचार्य नरेंद्र देव कृषि
तंत्रज्ञान विद्यापीठात “अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सव
२०२४-२५” आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे क्रीडा संघ सहभागी होण्यासाठी अयोध्याकडे
आज दिनांक २९ एप्रिल रोजी रवाना झाले. संघाच्या या महत्त्वपूर्ण सहभागासाठी आणि
यशासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच
स्पर्धेत यश मिळविण्यासाठी विशेष टिप्स देवून मार्गदर्शन केले. समवेत शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम हे होते.
या क्रीडा महोत्सवात भारतातील विविध विद्यापीठे आपले संघ विविध क्रीडा
प्रकारांत उतरवणार असून परभणी विद्यापीठाकडून बॅडमिंटन (मुले/मुली), टेबल टेनिस (मुले),
मैदानी स्पर्धा (मुले/मुली), कबड्डी (मुले),
खो-खो (मुले), बास्केटबॉल (मुले) या क्रीडा
प्रकारांमध्ये स्पर्धा खेळल्या जाणार आहेत.
स्पर्धेसाठी विद्यापीठातर्फे पात्र खेळाडूंची निवड पारदर्शक पद्धतीने
करण्यात आली असून अंतिम निवड झालेले सर्व ४० खेळाडू प्रशिक्षकासह अयोध्याकडे रवाना
झाले.
या महोत्सवात देशभरातील विविध कृषि विद्यापीठांतील प्रतिभावान खेळाडूंच्या सहभागामुळे क्रीडा व सौहार्दाचा एक सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.