Wednesday, April 23, 2025

बायोमिक्सने केली हळदी उत्पादनात क्रांती – प्रगतशील शेतकरी रत्नाकर ढगे यांची गौरवोद्गारांनी स्तुती

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे "बायोमिक्स हे अमृता सारखे काम करत आहे!"हे प्रेरणादायी उद्गार प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांनी दिनांक २२ एप्रिल रोजी लोहा येथील कृषीप्रधान शेतकरी सेंद्रिय उत्पादक कंपनी, यांच्या शिष्टमंडळासोबत विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्राला भेट दिल्यानंतर काढले.

बायोमिक्सच्या वापरामुळे संबंधित कंपनीच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असून, विशेषतः हळद या नगदी पिकामध्ये विक्रमी उत्पादन नोंदवण्यात आले आहे. या यशाचे श्रेय संपूर्णपणे बायोमिक्सला दिले जात आहे. याच विश्वासावर आधारित राहून यावर्षी कृषीप्रधान शेतकरी सेंद्रिय उत्पादक कंपनीने तब्बल तीन टन बायोमिक्सची आगाऊ खरेदी केली आहे.

या विशेष प्रसंगी श्री. रत्नाकर ढगे यांच्यासोबत श्री. गणपत जामगे, ओम भालके, ज्ञानोबा येवले व मनोज जाधव हे शेतकरी उपस्थित होते. त्यांच्यासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे व त्यांच्या सहकारी डॉ. पपीता गौरखेडे उपस्थित होते.

बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना बायोमिक्सच्या संशोधन, उत्पादन व वापराच्या पद्धतींची सविस्तर माहिती दिली. शाश्वत शेती आणि उत्पादनवाढीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बायोमिक्सचा हा यशस्वी प्रयोग सेंद्रिय शेतीला नवे परिमाण देतो आहे आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम व स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.