वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्र
शासनाच्या अर्थसहाय्याने "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME)"
अंतर्गत एक अत्याधुनिक सामायिक सुविधा अन्न प्रक्रिया केंद्र (Common
Incubation Centre – CIC) स्थापन करण्यात आले आहे.
दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी या नव्या केंद्रास विद्यापीठाचे मा. कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे
सदस्य व आमदार मा. श्री. सतीश चव्हाण आणि सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख यांनी भेट
देऊन सविस्तर पाहणी केली.
या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश
क्षीरसागर, तसेच डॉ. हेमंत देशपांडे व डॉ. सुरेंद्र सदावर्ते
उपस्थित होते.
कार्यकारी परिषद सदस्य व आमदार मा. श्री सतीश चव्हाण यांनी केंद्रातील
विविध अत्याधुनिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले व या केंद्राचा उपयोग
व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा अधिक प्रभावी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
त्यांनी स्थानिक शेतकरी, महिला गट, युवक आणि नवउद्योजक यांना या सुविधेचा लाभ
नक्कीच होईल अश्या भावना व्यक्त केल्या.
मा. श्री. प्रविण देशमुख यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, हे केंद्र
युवकांचे उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यात नक्कीच मोलाचे योगदान देईल.
प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी या केंद्राची माहिती देताना सांगितले
की, या अंतर्गत आधुनिक गुळनिर्मिती युनिट (गुळ, गुळ
पावडर, वड्या, काकवी), बाटलीबंद ऊस रस उत्पादन (जे खोलीच्या तापमानाला ४ महिने टिकते), मसाले प्रक्रिया आणि अन्न तपासणी प्रयोगशाळा अशा विविध सुविधा कार्यान्वित
करण्यात आल्या आहेत.
हे अन्न प्रक्रिया केंद्र शेतकरी, महिला बचत गट, युवक,
शेतकरी उत्पादक कंपन्या व लघु-सूक्ष्म उद्योजकांसाठी प्रशिक्षण,
तांत्रिक मार्गदर्शन व ब्रँड विकासाचे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार
आहे, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.