वनामकृवि, परभणी येथे माहितीपूर्ण व्याख्यान संपन्न
.jpeg)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या पुढाकाराने
"वैयक्तिक आर्थिक नियोजन" या विषयावर एक महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण
व्याख्यान दिनांक ७ एप्रिल रोजी पार पडले. हे व्याख्यान विद्यापीठाच्या परभणी
मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे संचालक
शिक्षण डॉ. भगवान आसेवार,
माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, कृषि
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ. राजेश क्षीरसागर, तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. जया बंगाळे हे प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित होते.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन
माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैयक्तिक आर्थिक नियोजन ही आजच्या
काळाची अत्यंत गरजेची बाब असल्याचे सांगितले. डॉ. भगवान आसेवार व डॉ. उदय खोडके
यांनीसुद्धा व्याख्यानाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉ. राहुल रामटेके यांनी केली. या
व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. चंद्रकांत तुरारे, संस्थापक,
स्मार्ट इन्व्हेस्टमेंट मार्गदर्शक व कोच, यांनी
उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी घर खरेदी, मुलांचे
शिक्षण, निवृत्ती नियोजन, बजेट तयार
करणे, खर्च नियंत्रण, बचत, कर्ज व्यवस्थापन, गुंतवणूक नियोजन इत्यादी
महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत माहिती दिली.
त्यांनी विविध गुंतवणूक पर्यायांबाबत - जसे की नॅशनल
सेव्हिंग्ज स्कीम,
किसान विकास पत्र, सुकन्या योजना, पीपीएफ, ईपीएफ, नॅशनल पेन्शन
स्कीम, म्युच्युअल फंड्स, एसआयपी,
एसडब्ल्यूपी - यांचे फायदे-तोटे समजावले. तसेच विमा संरक्षण,
वैयक्तिक पोर्टफोलिओचे नियोजन, जोखीम
व्यवस्थापन व आर्थिक सुरक्षिततेसाठी उपाय याबाबतही उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. हरीश आवरी यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. हा उपक्रम केवळ माहितीपूर्णच नव्हे तर सर्वांच्या आर्थिक साक्षरतेला बळ देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.