Saturday, April 12, 2025

‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ : रासायनिक खत वापराच्या बचतीसाठी सेंद्रिय खतांवर भर द्यावा !

 पीएम- प्रणाम योजनेबद्दल जागरूकता प्रभावीपणे राबविली जाणार... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाचा ४१ वा भाग दिनांक ११ एप्रिल रोजी यशस्वीरित्या पार पडला. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात रासायनिक खत वापराच्या बचतीसाठी जैविक व सेंद्रिय खताचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केंद्र शासनाच्या पीएम- प्रणाम (प्रधानमंत्री कार्यक्रम: भू-माता पुनरुज्जीवन, जनजागृती, पोषण आणि सुधारणा PM-PRANAM) या योजनेची थोडक्यात माहिती दिली. रासायनिक खतांचा संतुलित व कमीतकमी वापर करून सेंद्रिय शेतीला चालना देणे, जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि शाश्वत कृषी पद्धती विकसित करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. माननीय कुलगुरू यांनी पुढे सांगितले की, देशभरातील शेती विषमुक्त करणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारणे हे आजच्या काळातील अत्यंत आवश्यक पाऊल आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून आगामी काळात शेतकऱ्यांमध्ये पीएम- प्रणाम योजनेबद्दल जागरूकता वाढवण्याचे काम अधिक प्रभावीपणे राबविले जाणार आहे, असे नमूद केले. याद्वारे मराठवाड्यातील शेती विषमुक्त बनवण्याचे कार्य केले जाईल. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि उत्पादनावर देखील परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमच्या विषयाचे तांत्रिक मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी रासायनिक खतांचा अति वापर टाळून जैविक व सेंद्रिय खते घटकांचा योग्य वापर करण्यावर भर दिला. त्यांनी शेतीतील रासायनिक खतांचा अतिरिक्त वापरामुळे वाढत्या उत्पादन खर्चाचा ऊहापोह करताना सेंद्रिय घटकांचा वापर वाढविल्यास, जमिनीची सुपीकता सुधारते, अन्नघटकांची पूर्तता होते आणि पिकांवरील रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, असे नमूद केले. त्यांनी शेतकऱ्यांना चांगले कुजलेले शेणखत, गांडूळ खत, निंबोळी खत, विविध पेंडी, हिरवळीचे खत, जैविक खत यांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. याशिवाय पिकांची फेरपालट, शेतात शेळ्या-मेंढ्यांना वावरू देणे, पिकांचे अवशेष कुजवणे, हिरवळीच्या पिकांचे ठरावीक क्षेत्रात काही झाडे उगवून जमिनीत गाडणे, जैविक आच्छादन यासारख्या नैसर्गिक उपायांचा वापर करण्याचे मार्गदर्शन दिले.

हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्याचा हवामानाचा अंदाज दिला. हा कार्यक्रम विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी यांनी डॉ. प्रशांत देशमुख यांनी यशस्वी पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.

या कार्यक्रमात मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांतून शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना तांत्रिक प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता वाढत असून, अशा उपयुक्त कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आली.