विद्यापीठातील शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि कार्यक्षमतेची पावती... माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कारकीर्द प्रगती योजना (Career Advancement Scheme) अंतर्गत ५७ शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतनश्रेणी / शैक्षणिक स्तरावर पदोन्नती देण्यात आली आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तार कार्य व कर्मचारी केंद्रित प्रशासन या चार स्तंभांवर आधारित त्यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
विद्यापीठातील शिक्षकांनी अध्यापन, संशोधन व इतर शैक्षणिक उपक्रमांद्वारे
ठराविक पात्रता पूर्ण करून ही पदोन्नती मिळवली आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षकांचे
प्रस्ताव मागवून, त्यांचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विविध
समित्यांमार्फत सखोल परीक्षण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विद्यापीठे
सुधारणा अधिनियम, २०२३ आणि विद्यापीठ
अनुदान आयोग नियमावली, २०१०
अंतर्गत स्थापन 'पडताळणी व मूल्यमापन समिती'च्या शिफारशींनुसार पदोन्नती देण्यात आली.
या निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार रु ६००० वरून ७००० – ५, रु ७००० वरून ८०००
– २, आणि रु ८००० वरून ९००० – १ शिक्षकांना उच्च शैक्षणिक
वेतनश्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आली. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार स्तर १० वरून
स्तर ११ – १७, स्तर ११ वरून स्तर १२ – ८, आणि स्तर १२ वरून स्तर १३अ – २४ शिक्षकांना उच्च शैक्षणिक स्तर प्रदान
करण्यात आले.
या निर्णयाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व पदोन्नती मिळवलेल्या
कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, ही यशस्वी पदोन्नती म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असल्याचे
सांगितले. ते म्हणाले, ही प्रक्रिया केवळ वैयक्तिक प्रगती
नसून विद्यापीठातील शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि कार्यक्षमतेची पावती आहे.
कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनीही यावेळी सांगितले की, ही पदोन्नती
विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे प्रतीक असून, भविष्यातही
अशा संधी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच यामुळे कर्मचारी अधिक
कार्यक्षमतेने व उत्साहाने कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण प्रक्रियेस यशस्वी करण्यासाठी उप कुलसचिव श्री पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव
श्री राम खोबे, कक्ष अधिकारी श्री गंगाधर चांदणे, श्री नरेंद्र खरतडे आणि कुलसचिव कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी विशेष
परिश्रम घेतले.