सुदृढ माती असेल तर सुदृढ पिकेही निर्माण होतात... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन आणि
प्रशिक्षण केंद्र व शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सेंद्रिय व
नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिका" या उपक्रमांतर्गत शाश्वत शेतीसाठी
जमिनीचे दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मंगळवारी (दि. १ एप्रिल) ऑनलाईन
पद्धतीने विशेष कार्यशाळा संपन्न झाली. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख आयोजक म्हणून संचालक
संशोधन डॉ. खिजर बेग उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ मृदा
शास्त्रज्ञ आणि माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, सेंद्रिय
शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे आणि डॉ. पपिता गौरखेडे यांची
उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन याचे महत्त्व स्पष्ट केले.
ते म्हणाले की, सुदृढ माती असेल तर सुदृढ पिकेही निर्माण होतात. शाश्वत उत्पादनासाठी
जमिनीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी परड्यू विद्यापीठ
(अमेरिका) येथील प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सारस्वत यांच्यामार्फत कोरडवाहू
शेतीसाठी यांत्रिकीकरण व खर्च बचतीच्या तंत्रज्ञानावर सविस्तर माहिती दिली.
प्रमुख वक्ते डॉ. विलास पाटील यांनी आपल्या तांत्रिक मार्गदर्शनात सांगितले
की, समृद्ध मातीमुळे समृद्ध समाजाची उभारणी होते. सेंद्रिय शेती ही केवळ
पर्यावरणपूरक नव्हे, तर माती, पाणी,
पशुधन आणि अन्नसुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे
म्हणाले की, संपूर्ण कृषी व्यवस्थेसाठी ६ इंच मातीचा थर तयार
होण्यास १३०० कोटी वर्षे लागतात, त्यामुळे तिचे संवर्धन करणे
अत्यावश्यक आहे.
मराठवाड्यातील जमिनीच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले
की, येथील तापमान आणि कृषीयोग्य जमिनीचे अकृषीकरण होणे ही मोठी समस्या आहे.
मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे
शेतीच्या टिकाऊतेसाठी योग्य धोरणे आखणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन
केले की, शेतातील माती, पाणी, काडीकचरा आणि शेतकरी स्वतः शेतात कार्यरत राहिल्यास उत्पादनवाढ शक्य आहे.
कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सारस्वत हे अमेरिका येथून ऑनलाईन
सहभागी झाले होते. त्यांनी बैलचलित पेरणी यंत्र विकसित करण्यासंबंधी माहिती देताना
सांगितले की, हे यंत्र कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य
खोलीवर आणि ओलावा असलेल्या ठिकाणी बियाण्यांची योग्य पेरणी होण्यासाठी याचा
प्रभावी उपयोग होईल. तसेच, त्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या
कृषी यंत्रांची निर्मिती आणि वापर यावरही सखोल मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता
सोलंकी यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होवून प्राध्यापक डॉ.धर्मेद्र सारस्वत आणि शेतकऱ्यांमध्ये
चर्चा घडवून आणली.
या दोन तासांच्या विशेष संवाद सत्रात शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग
नोंदवला. शेतीतील तंत्रज्ञान व समस्या यावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सखोल
चर्चा झाली. कार्यक्रमात उपस्थित शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधानकारक
उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व
आभार प्रदर्शन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख,
शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी तसेच शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या
संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. झूम मिटिंग, यूट्यूब आणि
फेसबुक या माध्यमांतून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शाश्वत शेती आणि
मृदा आरोग्य व्यवस्थापन यावर भर देणारा हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त
ठरला.