Saturday, April 12, 2025

विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जीवनात अंगीकारावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन

 वनामकृवित सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन


भारताच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि ज्ञानार्जनाची तळमळ ही विद्यार्थ्यांनी अंगीकारावी. त्यांची जयंती हा एक उत्सव नसून तो अध्ययनाचा दिवस ठरवावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

भारताचे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ ग्रंथालयात ११ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग १८ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू बोलत होते.

कार्यक्रमाची सुरवात माननीय कुलगुरूंच्या शुभहस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, आणि अभिवादन करून तसेच  डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी घेतलेल्या बुद्ध वंदनेने करण्यात आली.

यावेळी बोलताना त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी यशोशिखर गाठले. हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी आयुष्यभर अभ्यासाची सवय ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आणि डॉ. मिलिंद सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष कदम यांनी मानले.