संशोधन प्रकाशन हे विद्यापीठांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे - कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने "शोध प्रकाशन आणि सर्वोत्तम पद्धतींद्वारे विद्यापीठांची गुणवत्ता सुधारण्यावर" एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर जयशंकर तेलंगाणा कृषि विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि नामवंत ग्रंथपाल डॉ. के. वीरांजनयुलु उपस्थित होते.
कार्यशाळेला विशेष उपस्थिती शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची होती. या कार्यशाळेत
संशोधन प्रकाशनाची महत्त्वपूर्ण भूमिका, सर्वोत्तम प्रकाशन
पद्धती, तसेच विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
क्रमवारीत सुधारणा करण्याच्या धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
संशोधन प्रकाशन हे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे
असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी संशोधनाच्या सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकत
विद्यापीठातील संशोधन आणि प्रकाशन प्रक्रियेतील पारदर्शकता व दर्जात्मक वृद्धीवर
भर दिला. पदव्युत्तर आणि आचार्य पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण
संशोधनावर भर देऊन त्यांच्या संशोधन लेखांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
स्तरावरील नामांकित नियतकालिकांमध्ये प्रकाशन करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
तसेच संशोधन लिखाण करताना वाड्मय चौर्य टाळण्याचे त्यांनी आवाहन केले. याबरोबरच विद्यापीठातील
शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात काम करणाया
शास्त्रज्ञांनी भविष्यातील आव्हाने ओळखून संशोधनावर लेख प्रकाशित करावेत.
विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची महाराष्ट्र शासनाने नोंद घेतली असून
विद्यापीठाच्या संशोधनाचा हा एक प्रकारे गौरव आहे. उत्कृष्ठ संशोधन लेखाद्वारे
विद्यापीठ राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल असेल, असा विश्वास माननीय कुलगुरूनी यावेळी व्यक्त
केला.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय आणि
राष्ट्रीय नियतकालिकांची माहिती उपस्थितांना दिली.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. के. वीरांजनयुलु यांनी उच्च प्रतीच्या शोधप्रबंध
प्रकाशनाच्या प्रक्रिया आणि उत्कृष्ट संशोधन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
विद्यापीठांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी संशोधन आणि प्रकाशनाच्या
गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या विविध उपाययोजनांवर त्यांनी भर दिला. गुणवत्तापूर्ण
लिखाणासाठी मोफत उपलब्ध असणाऱ्या ई-रिसोर्सेसबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती
दिली. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंग
पद्धतींचे सविस्तर विश्लेषण करत एनआयआरएफ रँकिंग रॅकींग मध्ये वाढ होण्यासाठी
त्यांनी या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यापीठ ग्रंथालय प्रमुख डॉ. संतोष कदम यांनी केले. संगणक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष फुलारी यांनी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघा सूर्यवंशी यांनी केले. विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाचा लाभ घेतला. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले.