Wednesday, April 2, 2025

ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पाला मान्यवरांची भेट : सौर ऊर्जा आणि शेतीच्या नवसंशोधनाला नवी दिशा!

 शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तंत्रज्ञानाचा उपयोग माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठद्वारा मानवत येथे कार्यान्वित असलेल्या ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पास २ एप्रिल रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत पंजाब ऊर्जा विकास अभिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नीलिमा, पंजाब कृषि विश्वविद्यालयाच्या संशोधन संचालक डॉ. अजमेर सिंग धाट आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतीतील जोखीम व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल, यावर भर दिला.

सदर प्रकल्प मागील दोन वर्षांपासून अत्याधुनिक संशोधन करीत असून, त्याचे कार्य भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक ठरत आहे. भविष्यातील सौर ऊर्जा व शेतीतील संशोधन अधिक अद्ययावत करण्यासाठी अनेक संस्था या प्रकल्पास सहकार्य करण्यास इच्छुक आहेत.

या संशोधन प्रकल्पाचे कार्य संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जाते. भेटी दरम्यान प्रकल्पाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. नवनवीन पिकांवर होणारे संशोधन हे शेतीसाठी क्रांतिकारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी प्रकल्पातील तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती होती. यामध्ये इंजिनीयर शरद शर्मा, डॉ. विश्वजीत हंस, डॉ. गुरु मित सिंग, श्री. विवेक सराफ, इंजि. अभिषेक शास्त्री, दीपिका सक्सेना, डॉ. कलालबंडी आणि डॉ. सुनिता पवार यांचा समावेश होता.

ही भेट सौर ऊर्जा आणि शेतीतील संशोधनाला नवी दिशा देणारी ठरली असून, भविष्यातील नवकल्पना आणि संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देणारी आहे.