Saturday, July 18, 2026

बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान : शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम

 कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रम


बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुढील शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड होय. आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक व रोजगाराच्या युगात विद्यार्थ्यांसमोर विविध शाखांतील असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ पारंपरिक विचारांवर किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, कौशल्ये, करिअरच्या संधी आणि भविष्यातील रोजगारक्षमतेचा सर्वांगीण विचार करूनच अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे.

नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टी यांच्या आधारे घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया ठरू शकतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान उपलब्ध अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये, त्यामधील करिअरच्या संधी आणि संबंधित क्षेत्रातील भविष्यातील मागणी यांचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेणे हितावह ठरेल.

यामध्ये करिअरच्या नव्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्रातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच कृषि शिक्षणांतर्गत हा चार वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. इयत्ता १२ वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्रदान केली जाते. सामान्य पदवीपेक्षा ऑनर्स पदवीला करिअरच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

कृषि विद्यापीठांमधील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असून महाराष्ट्र शासनाने सन २०२१ मध्ये शासन निर्णयाद्वारे सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाला कृषि विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रमांप्रमाणेच समकक्ष दर्जा प्रदान केला आहे.

तसेच बी. एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान ह्या दोन्ही पदव्या एकच असल्याबाबत महाराष्ट्र शासनाचा आदेश (जीआर) निर्गमित करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला. यामुळे महाराष्ट्र शासनाने माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तसेच महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव यांच्या स्वाक्षरीने आदेश दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी (संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०२१३१६०४४२९९०१) निर्गमीत केला. यामध्ये राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या बी. एससी गृह विज्ञान / B.Sc. Home Science, बी.एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / B.Sc. (Hons) Home Science / बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान / B. Sc. (Hons) Community Science या सर्व अभ्यासक्रमांच्या पदव्या एकच असल्याने बी.एससी (गृह विज्ञान) / B.Sc. (Home Science) पदवी प्राप्त उमेदवारांना भरती प्रक्रिया प्रक्रियेत ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या, त्या बी. एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / B.Sc. (Hons) Home Science व बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान / B. Sc. (Hons) Community Science या  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उमेदवारांना उपलब्ध राहतील, असे नमूद केले आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण, संशोधन व औषधी द्रव्ये विभागामार्फत आहारतज्ज्ञ (Dietitian) पदासाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संगणक-आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून आहारतज्ज्ञ (Dietitian) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळविली आहे. तसेच योगेश्वरी सतिशराव पवार, जान्हवी रंगराव उक्कलगावकर आणि स्वाती बाळासाहेब पवार या तीन विद्यार्थिनींची प्रतीक्षा यादीत (Waiting List) निवड झाली आहे.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच सक्षम प्राधिकरणामार्फत आयोजित एमएचटी-सीईटी, जेईई किंवा नीट या प्रवेश परीक्षांपैकी कोणतीही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमासाठी मुला - मुली दोघांनाही प्रवेश खुला आहे. शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळतो. तसेच शुल्कासंदर्भातील शासनाच्या सर्व सवलती या अभ्यासक्रमालाही लागू आहेत.

करिअरच्या विविध संधी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचे सखोल प्रशिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध होतात.

याशिवाय जिल्हा रुग्णालये, दवाखाने, क्रीडा विभाग, व्यायामशाळा, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), रेल्वे विभाग तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये आहारतज्ज्ञ, महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, आयसीडीएस पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बिहेव्हिअर मॉडिफिकेशन थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, बँका, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH), आयसीएमआर-एनआयएन (ICMR-NIN) आदी संस्थांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

उद्योजकतेच्या संधी

स्किल इंडिया मिशनला अनुसरून या अभ्यासक्रमामध्ये स्टार्टअप आणि स्वयंरोजगारालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या दर्जेदार पूर्वप्राथमिक शाळा, पाळणाघरे, आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, इंटेरिअर डिझाइनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हस्तकला (हँडीक्राफ्ट्स) युनिट, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझाइनिंग यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम केले जाते.

तसेच अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लँडस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझाइनिंग, निवासी व व्यावसायिक इमारती, दवाखाने, मॉल्स यांच्यासाठी गार्डन डिझाइनिंग, पुष्परचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको-टुरिझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्मिती, हाऊसकीपिंग, पत्रकारिता, व्हिडिओग्राफी, कंपन्यांमधील पब्लिक रिलेशन ऑफिसर (PRO) तसेच मार्केटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

उच्च शिक्षण व नोकरीच्या संधी

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीए अभ्यासक्रमासाठी पात्र असून त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेच्या बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता येतो.

याशिवाय स्पेशल एज्युकेशन, स्पीच थेरपी, बाल व कौटुंबिक समुपदेशन, इंटेरिअर डिझाइनिंग, फॅशन डिझाइनिंग, स्कूल काउन्सेलिंग आदी विषयांतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थी यशस्वी करिअर घडवू शकतात.

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठीही पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संधी

किशोर न्याय मंडळ (JJB), केंद्रीय समाजकल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ (UNICEF), युएनडीपी (UNDP), युएसडी, एफएओ (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही सामुदायिक विज्ञान पदवीधरांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी आणि पालकांनी या अभ्यासक्रमाची व्यापक व्याप्ती, रोजगारक्षमतेच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या क्षमता लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

 प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/cap_2026-27           www.mcaer.org

 डॉ. नीता गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, भ्रमणध्वनी : ७७७४८४१६४९

डॉ. शंकर पुरी, विषय प्रमुख, भ्रमणध्वनी : ९३२६१०६०३६

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी