वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर)
येथील फळ संशोधन केंद्रात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते
दिनांक १८ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
त्यानंतर त्यांनी फळ संशोधन केंद्रासह छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि
संशोधन प्रकल्प, कृषि तंत्र विद्यालय, कृषि विज्ञान केंद्र तसेच बदनापूर कृषि महाविद्यालयातील विविध संशोधन प्रकल्प,
शिक्षण, विस्तारकार्य आणि सुरू असलेल्या
विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी आयोजित बैठकीत केंद्रातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना माननीय कुलगुरूंनी विविध संशोधन
उपक्रमांची प्रगती, शेतकरीहिताच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि
प्रात्यक्षिकांची माहिती जाणून घेतली. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान अधिक
प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न वाढविण्याच्या सूचना त्यांनी
दिल्या.
बैठकीत मराठवाड्यातील विविध भागांतील खरीप हंगामातील पेरणीची सद्यस्थिती, विविध पिकांची वाढ, पावसाचा खंड,
जमिनीतील ओलाव्याची कमतरता तसेच एल निनो (El Niño) परिस्थितीचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम याचाही सविस्तर आढावा घेण्यात
आला.
यावेळी माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून सध्याचे
पर्जन्यमान, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि
हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले.
तसेच पिकांचे संरक्षण, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन, कार्यक्षम पाणी व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत
शेतीसाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस बदनापूर कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) डॉ.
सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.
संजय पाटील तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा. दत्तात्रय मुळे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी वृक्षारोपण, पर्यावरण
संवर्धन तसेच शेतकरीकेंद्रित संशोधन, शिक्षण आणि
विस्तारकार्याच्या माध्यमातून कृषि विकासाला अधिक चालना देण्याचा संकल्प व्यक्त
करण्यात आला.



