Thursday, July 2, 2026

सावरगाव येथे कृषि दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी व रेशीम संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरुकता कार्यानुभव (रावे - RAWE) कार्यक्रमांतर्गत माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै २०२६ रोजी सावरगाव (ता. मानवत, जि. परभणी) येथे कृषि दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कृषि महाविद्यालय, परभणीच्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कार्यरत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपणानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद भोगावकर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक महत्त्व सांगून वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय, परभणीचे रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद भोगावकर, रावे विद्यार्थी, जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. राजेभाऊ घाटूळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद शेंडगे तसेच शिक्षक श्री. व्यंकट बोरगावे, श्री. श्रीपाद माटेगावकर, श्री. संतोष खामकर, श्रीमती वैशाली डहाळे व श्रीमती आम्रपाली मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी गावातील शेतकरी श्री. बालासाहेब जाधव, श्री. नारायण जाधव, श्री. हनुमान टरपले, श्री. प्रमोद जाधव, श्री. अर्जुन घाटूळ, श्री. बबन गव्हाणे, श्री. केशव हरकळ, श्री. केशव घाटूळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.