Saturday, July 18, 2026

उजळंबा येथे ‘लम्पी व खुरी’ रोग प्रतिबंधक पशुधन लसीकरण कार्यक्रम संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, परभणी आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) व औद्योगिक संलग्नता–२०२६ अंतर्गत दिनांक १७ जुलै २०२६ रोजी उजळंबा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात 'लम्पी' 'खुरी' रोग प्रतिबंधक विशेष पशुधन लसीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एकूण १०८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रवीण वैद्य यांनी पशुधनाचे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच कृषी व्यवसायाला पूरक घटक म्हणून असलेले महत्त्व विशद केले. पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक वागडकर यांनी पशुधनाची योग्य निगा, आरोग्य व्यवस्थापन, नियमित लसीकरणाचे महत्त्व तसेच विविध रोगांपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकरी व पशुपालकांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.

कार्यक्रमास रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम, शिक्षण प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व केंद्रप्रमुख डॉ. आनंद गोरे तसेच उजळंबा गावाचे सरपंच श्री विठ्ठल रावजी धोतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या विशेष लसीकरण मोहिमेस गावातील शेतकरी व पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक वागडकर व त्यांच्या कार्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे, विषय विशेषज्ञ डॉ. रमेश पाटील तसेच रावे सत्रातील कृषीदूत आणि कृषीकन्या यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.