माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात १०७ वा ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम यशस्वी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या
विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर
(ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक
१७ जुलै २०२६ रोजी ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद उपक्रमाचा १०७ वा भाग यशस्वीरित्या
संपन्न झाला. सद्य परिस्थितीतील पावसाचा खंड : पीक नियोजन व उपाययोजना" हा
कार्यक्रमाचा विषय होता.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वातून हा कार्यक्रम संपन्न
झाला. कार्यक्रमाचे समन्वयक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी
प्रास्ताविकात हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने पीक नियोजन
करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते विद्यापीठाचे अंबाजोगाई येथील विभागीय कृषि विस्तार संशोधन केंद्राचे
प्रा. अरुण गुट्टे यांनी पावसाच्या
खंडाच्या काळात पिकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत, तण नियंत्रण, सेंद्रिय खतांचा वापर,
आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन तसेच जलसंधारणाच्या उपाययोजना
प्रभावीपणे राबविण्याचा सल्ला दिला.
तसेच पावसाचा खंड वाढल्यास १९:१९:१९ किंवा १३:०:४५ यांसारख्या विद्राव्य
खतांची कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फवारणी केल्यास पिकांवरील ताण कमी
होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. पिकांची वाढ,
पानांचा हिरवागारपणा आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी
विद्राव्य खतांचा वापर केवळ शिफारशीनुसारच करावा, असेही
त्यांनी नमूद केले.
याशिवाय पावसाचा खंड दीर्घकाळ राहिल्यास पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके
टिकविण्यास प्राधान्य द्यावे. तसेच पाऊस अधिक विलंबाने झाल्यास कमी कालावधीची, दुष्काळ सहनशील किंवा पर्यायी पिकांचे नियोजन करावे,
असा सल्लाही त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी नियमितपणे शेताची पाहणी करून
कीड व रोगांचे निरीक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार तातडीने नियंत्रणाच्या उपाययोजना
कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, आणि कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास राज्यातील विविध कृषि विज्ञान केंद्रांतील शास्त्रज्ञ, कृषि अधिकारी, प्रगतिशील शेतकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे देत शास्त्रोक्त शिफारशींची सविस्तर माहिती दिली.


