Thursday, July 16, 2026

वनामकृवित शिक्षणासाठी आलेल्या बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या आयसीएआर नागनाथ मुलांचे वसतिगृह येथे परभणी येथील जिल्हा विधी सेवा प्रधिकरणचे वतीने बाहेरील राज्यांतील, विशेषतः पूर्वोत्तर भारतातील राज्यांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर बाबींची माहिती, संविधानिक अधिकारांची जाणीव तसेच विविध कायदेशीर अडचणींवर मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी विशेष कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे हे होते. प्रमुख उपस्थितीत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, मुख्य वसतिगृह अधीक्षक तथा विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत, वसतिगृह सहाय्यक श्री. शेलार तसेच विविध राज्यांतील सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, शिक्षणासोबतच कायदेविषयक जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची संविधानिक किंवा कायदेशीर अडचण उद्भवल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोफत विधी सहाय्याचा लाभ घ्यावा. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्रधिकरणचे पॅनल विधीज्ञ ॲड. श्री संदीप पाठारे आणि अधिकार मित्र कुमारी श्रुती माळी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने प्रदान केलेले मूलभूत अधिकार, मोफत विधी सहाय्याची उपलब्धता, शिक्षणादरम्यान उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी, सायबर गुन्हे, महिलांच्या सुरक्षेसंबंधी कायदे, रॅगिंग प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सेवांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास घाबरून न जाता कायद्याचा आधार घेऊन योग्य मार्गाने प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. राजेश कदम यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण, शिस्त, परस्पर सहकार्य आणि कायद्याचे पालन याबाबत मार्गदर्शन केले. विविध संस्कृती व राज्यांतील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत असताना परस्पर आदर, संवाद आणि कायदेशीर जागरूकता ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी विद्यापीठात शिक्षणासाठी देशाच्या विविध राज्यांतून विद्यार्थी येत असून, त्यांना सुरक्षित, कायदेविषयकदृष्ट्या जागरूक व आत्मविश्वासपूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. शिलारे यांनी उपस्थित मान्यवर, विधिज्ञ आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कायदेशीर विषयांवर प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.