राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख पाहुण्या, अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि; 'आत्मनिर्भर मराठवाडा २०३०'च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे परभणी येथील अन्न तंत्रज्ञान
महाविद्यालय, चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) आणि सेवा भारती देवगिरी (जिल्हा परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,
दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या
प्रशासकीय इमारतीतील सिम्पोझियम हॉल येथे उद्योग–शैक्षणिक संवाद (Industry–Academia
Interaction Programme) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास UAA
(UDCT-अॅल्युमनी असोसिएशन), मराठवाडा चॅप्टर
आणि AFSTI (असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स
– इंडिया), परभणी चॅप्टर यांचे सहकार्य लाभले आहे.
हा कार्यक्रम 'उद्यम (UDYAM) – विकसित मराठवाडा मिशन' अंतर्गत आयोजित करण्यात येत असून 'विकसित भारत - विकसित
महाराष्ट्र - विकसित मराठवाडा' या संकल्पनेवर आधारित चेंबर
फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) च्या
प्रादेशिक विकास अभियानाचा तो महत्त्वाचा भाग आहे. 'आत्मनिर्भर
मराठवाडा २०३०' हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि
स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास,
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री
(परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून
उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि असतील.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती
मेघना साकोरे-बोर्डीकर, अध्यक्ष माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि उद्योग
तज्ज्ञांची प्रमुख व्याख्याने आणि मार्गदर्शन होईल. कार्यक्रमाची सुरुवात CASMB चे सरचिटणीस डॉ.
उमेश कांबळे यांच्या स्वागतपर भाषणाने होईल. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, अन्नप्रक्रिया उद्योजक, स्टार्टअप्स तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) प्रतिनिधी सहभागी होणार
आहेत.
'उद्यम' मिशनअंतर्गत शेतस्तरावर मूल्यवर्धन (Value
Addition at Farm Gate), MSMEs व स्टार्टअप्सना चालना, युवा व महिला उद्योजकता, बाजारपेठ जोडणी व निर्यात
आणि शाश्वत विकास या पाच प्रमुख सूत्रांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्याशी घट्ट नाळ असलेल्या
तीन यशस्वी उद्योगतज्ज्ञांकडून विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि युवा उद्योजकांना
थेट मार्गदर्शन मिळणार आहे.
श्री. सतीश आर. भोरकडे हे खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ असून
त्यांना फूड इंग्रेडिएंट्स (Food Ingredients) आणि सीझनिंग उद्योगातील १९ वर्षांहून अधिक
अनुभव आहे. त्यांनी प्रविण मसाले, युनायटेड ब्रुअरीज,
VKL Seasonings, Wild Flavors/ADM Agro आणि Flavosys India यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये कार्य केले आहे. ते VNMKV चे माजी विद्यार्थी असून त्यांनी जगभरातील ५,००० हून
अधिक विद्यार्थी व व्यावसायिकांशी संवाद साधत ८० पेक्षा अधिक व्याख्याने दिली
आहेत. तसेच १२ हून अधिक फूड स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले आहे. ते खाद्य घटक,
उत्पादन विकास, अन्नप्रक्रिया उद्योगातील
करिअर आणि उद्योजकता या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
श्री. अतिश जयप्रकाश साळुंखे हे मराठवाड्यातील अग्रगण्य उद्योगपती आहेत.
त्यांनी २००६ मध्ये भूमी न्यूट्रास्युटिकल्स प्रा. लि. ची स्थापना केली. आज ही
कंपनी महाराष्ट्रातील आघाडीच्या हर्बल एक्स्ट्रॅक्ट आणि न्यूट्रास्युटिकल उत्पादक
उद्योगांपैकी एक असून तिला ISO, GMP, HACCP, Kosher, Halal, FDA आणि FSSAI यांसह विविध मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे प्राप्त आहेत. २०२० मध्ये त्यांनी
बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करून त्याची गाळप क्षमता २,५०० टनांवरून ४,५०० टन प्रतिदिन (TCD) पर्यंत वाढवली. तसेच भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) धोरणानुसार ६० KLPD क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारला
असून त्याचा विस्तार १२० KLPD पर्यंत करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण भागातील तांत्रिक शिक्षणासाठी त्यांनी बसमत येथे JRD Institute of
Technology ची स्थापना केली आहे. ते उद्योग पुनरुज्जीवन, कृषि प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण औद्योगिकीकरण या विषयांवर मार्गदर्शन
करतील.
श्री. श्रीपाद गोरोबा ठोंबरे, प्रकल्प समन्वयक, नॅचरल उद्योग समूह, यांना २०११ पासून नैसर्गिक दुग्ध
व्यवसायातील १५ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. लातूर येथील यांत्रिकी अभियंता
असलेले श्री. ठोंबरे प्रकल्प अंमलबजावणी, दुग्ध मूल्यसाखळी
आणि उद्योग संचालन या विषयांवर सहभागींचे मार्गदर्शन करतील.
मराठवाड्याच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा
मराठवाड्यात अन्नप्रक्रिया क्षेत्रात
लक्षणीय प्रगती होत असून
केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (MoFPI) वतीने
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME – Pradhan Mantri
Formalisation of Micro Food Processing Enterprises) यामध्ये मराठवाड्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तसेच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. चिराग पासवान जी
यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या परभणी विद्यापीठातील कॉमन इन्क्युबेशन सेंटर मुळे
स्थानिक उद्योजकांना सुमारे रु ३२९.५० लाख किमतीच्या अत्याधुनिक प्रक्रिया व
परीक्षण सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
प्रतिक्रिया
राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना
साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या,
"मराठवाड्यातील युवकांमध्ये क्षमता आणि प्रतिभेची कमतरता नाही;
गरज आहे ती योग्य संधी आणि सक्षम व्यासपीठाची. 'उद्यम'सारख्या उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्रातील
यशस्वी व्यक्ती थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे नव्या पिढीला उद्योग
उभारण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे
उभे आहे. विकसित महाराष्ट्रातून विकसित भारताचा मार्ग याच माध्यमातून घडणार
आहे."
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण २०२० नुसार आम्ही उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' म्हणून नियुक्ती केली आहे.
विद्यापीठातील कॉमन इन्क्युबेशन सेंटर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव
देत आहे. या संवाद कार्यक्रमामुळे यशस्वी उद्योगपती आणि विद्यार्थी एकाच
व्यासपीठावर येतील. यामुळे कृषि पदवीधर नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनतील.
सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे म्हणाले, ‘उद्यम’ हे CASMB
चे असे अभियान आहे की मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या कृषि
उत्पादनांचे प्रक्रिया, ब्रँडिंग आणि विपणनही मराठवाड्यातच
व्हावे. सतीश भोरकडे, अतिश साळुंखे आणि श्रीपाद ठोंबरे
यांसारखे यशस्वी उद्योगतज्ज्ञ जेव्हा आपल्या मातीतल्या युवकांना थेट मार्गदर्शन
करतात, तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नवे स्टार्टअप्स आणि MSMEs उभे
राहावेत, हेच आमचे ध्येय आहे.
या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी अन्नतंत्र महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉ राजेश क्षीरसागर (मोबाईल क्रमांक ९८३४९ ०५५८०) व सरचिटणीस डॉ. उमेश कांबळेयांच्याशी संपर्क साधावा
चेंबर फॉर
अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) विषयी
चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) ही संस्था
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी
कार्यरत आहे. तंत्रज्ञान, कौशल्य विकास, बाजारपेठ, निर्यात संधी आणि शासकीय योजनांशी
उद्योजकांना जोडण्याचे काम संस्था करते. उद्योग, विद्यापीठे,
वित्तीय संस्था आणि शासन यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांना
कल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत सक्षम करण्यासाठी CASMB सातत्याने
कार्यरत आहे. याचे नेतृत्व डॉ. प्रबोध हळदे (चेअरमन), निलेश
लेले (अध्यक्ष) आणि डॉ. उमेश कांबळे (सरचिटणीस) करत आहेत, अशी माहिती या संस्थेचे माध्यम
संपर्क अधिकारी श्री विजय गायकवाड यांनी कळविले आहे.
