ज्ञान आणि कौशल्य यांचा समन्वयच उत्कृष्ट कार्याचा पाया – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर - ICAR) पुरस्कृत
एससी-एसपी व टीएसपी अंतर्गत ‘भविष्याभिमुख कौशल्य विकास प्रमाणपत्र
अभ्यासक्रम’ (Future-Ready Skill Development Certificate Courses) या दोन दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्या
सभागृहात संपन्न झाले. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. १७ व १८ जुलै २०२६ दरम्यान
आयोजित करण्यात आला आहे.
या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती व अनुसूचित
जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच इतर सर्व प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना
भविष्यातील रोजगार, उद्योजकता आणि आधुनिक कृषि
क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान,
उद्योगाभिमुख ज्ञान आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, स्पर्धात्मक आणि रोजगारक्षम
बनविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि यंत्र शिक्षण (Machine Learning), ब्लॉकचेन
व्यवस्थापन (Blockchain Management), पायथन प्रोग्रामिंग (Python
Programming) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet of Things -
IoT) या विषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि हे अभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे व संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित
होते. व्यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल
रामटेके, आयसीएआरचे विद्यापीठ नोडल अधिकारी तथा कृषि
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे, विद्यापीठ ग्रंथपाल
डॉ. संतोष कदम, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण तसेच न्यू
इंडिया पब्लिशिंग एजन्सी (NIPA), नवी दिल्लीचे प्रशिक्षक
श्री. राजकुमार पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कौशल्य विकास हा केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नसून समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. कोणतेही उत्कृष्ट कार्य करण्यासाठी
ज्ञानाबरोबरच कौशल्याची जोड आवश्यक असते. विद्यापीठ विद्यार्थी, अधिकारी व प्राध्यापकांच्या कौशल्यवृद्धीसाठी सातत्याने विविध उपक्रम
राबवत असून भारतीय कृषि अनुसंधान परिषद तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अनेक
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विद्यापीठाने प्राध्यापक व
विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील प्रशिक्षणासाठीही संधी उपलब्ध करून दिली असून
त्याचा लाभ संशोधन व शिक्षण कार्यात होत आहे. या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा
समाजहितासाठी प्रभावी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांकडे ज्ञान असते; मात्र
त्या ज्ञानाला कौशल्याची जोड मिळणे आवश्यक असते. या प्रशिक्षणामुळे ज्ञानाबरोबरच
कौशल्यातही निश्चितच भर पडेल आणि संशोधन तसेच दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले
सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता विकसित होईल. प्रत्येक व्यक्तीकडे बुद्धिमत्ता असते;
परंतु तिचे योग्य प्रशिक्षण झाल्यास कार्यक्षमता अधिक प्रभावी होते,
असे माननीय कुलगुरू नेहमी सांगतात, असे
त्यांनी नमूद केले. विविध अधिकाऱ्यांच्या समन्वयाने घटकांनी एकत्रितपणे आयोजित
केलेला हा कार्यक्रम एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी "6
Ps – Prior Proper Planning Prevents Poor Performance" या
सूत्राचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून दिले.
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून त्यास कौशल्याची जोड
आवश्यक आहे. कृषि व कृषि संलग्न क्षेत्रांतील विविध समस्या सोडविण्यासाठी
ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य आवश्यक असून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण
महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेमार्फत हा कौशल्य विकास कार्यक्रम मंजूर झाला असून त्याद्वारे
विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. कौशल्यविकासामुळे
विद्यार्थ्यांची क्षमता विकसित होऊन ते नोकरी मागणारे नव्हे तर रोजगारनिर्मिती
करणारे बनू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल साक्षरता, उच्च शिक्षण आणि सातत्यपूर्ण कौशल्यविकास यांना विशेष महत्त्व असून या
प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाविषयीही सकारात्मक दृष्टीकोन
निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वागतपर भाषणात अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी सांगितले की, या प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial
Intelligence) यासह विविध आधुनिक आणि भविष्योन्मुख विषयांवर
प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबत कौशल्यविकास आवश्यक असून
केवळ ज्ञान आणि कठोर परिश्रम पुरेसे नसतात; त्यास कौशल्याची
जोड असणे आवश्यक आहे. कौशल्यामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते तसेच कोणत्याही
परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयसीएआरचे विद्यापीठ नोडल अधिकारी तथा कृषि
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार बहुविषयक शिक्षण,
उद्योगाभिमुखता आणि कौशल्यविकासाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
त्यानुसार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेमार्फत विद्यापीठाने विविध उपक्रम हाती
घेतले असून या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांची पडताळणी करून
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या न्यू इंडिया पब्लिशिंग एजन्सी (NIPA), नवी दिल्ली या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात न्यू इंडिया पब्लिशिंग एजन्सी (NIPA), नवी दिल्लीचे प्रशिक्षक श्री. राजकुमार पंडित विद्यार्थ्यांना
प्रशिक्षण देत आहेत.
सूत्रसंचालन डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास कृषि,
कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामुदायिक
विज्ञान, अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या महाविद्यालयांतील
५७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.







