भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (Department
of Science and Technology – DST) अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या
‘अतिसूक्ष्म स्वरूपातील खतनिर्मिती व प्रक्षेत्र चाचणी’ या
महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते
दिनांक १७ जुलै २०२६ रोजी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत
कार्यरत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT), मुंबई
येथे संपन्न झाले.
हा प्रकल्प केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या
प्रकल्पासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत एकूण ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर
करण्यात आला असून, त्यापैकी ९ लाख रुपये वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठास दोन वर्षांच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार
आहेत.
या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने
केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथे
स्फुरद, गंधक, जस्त, लोह आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची अतिसूक्ष्म (Nano/Ultra-fine) स्वरूपातील खते विकसित करण्यात येणार आहेत. या खतांची कार्यक्षमता,
परिणामकारकता तसेच पिकांच्या वाढी व उत्पादनावरील परिणामांचा अभ्यास
करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सोयाबीन व
कापूस या पिकांवर प्रक्षेत्रीय चाचण्या घेण्यात येणार आहेत.
सदर प्रकल्प विद्यापीठात कार्यान्वित करण्यासाठी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडे विशेष
पाठपुरावा केला होता. विद्यापीठात हा प्रकल्प मृद विज्ञान विभाग आणि कृषीविद्या
विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, त्यामध्ये
कृषी अभियांत्रिकी, कृषीविद्या, मृद
विज्ञान आणि विस्तार शिक्षण विभागांचा समन्वय राहणार आहे. या बहुविद्याशाखीय
सहभागामुळे प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. अशोक कुमार, डॉ. मनोज महावर तसेच संस्थेतील अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार आणि अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग नोंदविला, तर मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर हे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. याशिवाय डॉ. मिर्झा बेग, डॉ. प्रवीण कापसे आणि डॉ. स्वाती झाडे यांनीही ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला.

