Saturday, July 18, 2026

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सुवर्णकाळ; शासकीय सेवेत वाढत्या संधी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सन १९८६ मध्ये कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्याशाखेतील पदवीधर शासकीय सेवेसह सिंचन (इरिगेशन) कंपन्या, पाणलोट विकास कार्यक्रम, कृषि प्रक्रिया उद्योग, कृषि अवजारे व यंत्रसामग्री निर्मिती उद्योग, ट्रॅक्टर व संबंधित उद्योग, बीजप्रक्रिया केंद्रे, अपारंपरिक ऊर्जा साधनांशी संबंधित उद्योग, कृषि स्थापत्य क्षेत्र तसेच इतर विविध कृषिपूरक क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.

महाराष्ट्र शासनाने मृद व जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतीबंध दिनांक  २७ मे २०२६ रोजी मंजूर केला आहे. या सुधारित आकृतीबंधामध्ये कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेस सुमारे ४० टक्के पदांना मान्यता देण्यात आली असून, त्यांची संख्या २,३९५ इतकी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध योजना तसेच मृद व जलसंधारणाशी संबंधित कामे अधिक गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यास मदत होणार असून, या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस मोठी चालना मिळणार आहे.

याशिवाय, राज्यातील कृषि विद्यापीठांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास दिनांक १० जून २०२६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी सुमारे २५० ते ३०० कृषि अभियंत्यांना सेवासंधी उपलब्ध होणार आहेत.

सध्या सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशींनुसार कृषि अभियांत्रिकीचा नवीन अभ्यासक्रम राबविण्यात येत असून, मॉडेल अॅक्ट-२०२३ नुसार शैक्षणिक पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कृषि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी शासकीय सेवेमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

माननीय केंद्रीय कृषिमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्रात कृषि अभियांत्रिकीचा स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचा उल्लेख केला आहे. हा संवर्ग अस्तित्वात आल्यानंतर कृषि अभियंत्यांसाठी शासकीय सेवेत आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंधही लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा असून, त्यामध्येही कृषि अभियंत्यांसाठी विविध पदांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी पदांच्या संवर्गनिहाय सुधारित आकृतीबंधास दिनांक १६ जून २०२६ रोजी मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्येही कृषि अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

वरील सर्व बाबींचा विचार करता कृषि अभियंत्यांना मृद व जलसंधारण विभाग, कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तसेच इतर शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कृषि अभियांत्रिकी या विद्याशाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

म्हणूनच विद्यार्थ्यांनी कृषि अभियांत्रिकी या विद्याशाखेला प्राधान्याने प्रवेश घेऊन कृषि क्षेत्रात कार्य करण्याचे आपले स्वप्न साकार करावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतीय व महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्यासाठी योगदान द्यावे. तसेच "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी" या आपल्या पारंपरिक ब्रीदवाक्याला आधुनिक संदर्भात नव्याने अर्थ प्राप्त करून देत कृषि क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापनेची उद्दिष्टे

१.     आचार्य पदवी (कृषि अभियांत्रिकी) तीन वर्षांचा, पदव्युत्तर पदवी (कृषि अभियांत्रिकी) दोन वर्षांचा तसेच बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) चार वर्षांचा अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण व अद्ययावत करणे.

२.     कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेतील सर्व विषयांमध्ये संशोधन व विकासाची कामे हाती घेऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे.

३.     कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात अल्पकालीन व दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे.

४.     विद्यार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रम व कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे.

५.     विस्तार शिक्षणांतर्गत शेतकरी मेळावे, कृषि अवजारांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन, मृद व जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, विद्युत व ऊर्जा व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजित करणे.

महाविद्यालयातील कार्यरत विभाग

१.     सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग

२.     मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग

३.     कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग

४.     अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभाग

५.     कृषि स्थापत्य अभियांत्रिकी विभाग

६.     कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभाग

७.     मूलभूत विज्ञान व संगणकशास्त्र विभाग

कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेची वैशिष्ट्ये

कृषि क्षेत्रातील आधुनिक संशोधनाद्वारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारी ही एक महत्त्वपूर्ण विद्याशाखा आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत, कमी मनुष्यबळात आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे कार्य ही विद्याशाखा करते.

मृदा व जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, आधुनिक सिंचन पद्धती, पाणलोट क्षेत्र विकास, पावसाच्या पाण्याचे संवर्धन व कार्यक्षम व्यवस्थापन, तसेच "एक स्रोत – एक शेततळे" यांसारख्या संकल्पनांच्या विकासामध्ये या विद्याशाखेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शाश्वत शेतीसाठी मृदा व जलसंवर्धनाच्या विविध तांत्रिक उपाययोजना विकसित करून त्यांचा प्रसार केला जातो.

मूलभूत विज्ञान व संगणकशास्त्राची जोड असल्यामुळे विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), मशीन लर्निंग, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सेन्सर तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि डिजिटल शेती व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.

कृषि स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत हरितगृह तंत्रज्ञान, टिश्यू कल्चर, शाश्वत शेती, दुग्धव्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन तसेच कृषि पायाभूत सुविधांच्या नियोजनासंबंधी ज्ञान दिले जाते. अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभागामार्फत सौर, बायोगॅस, जैवऊर्जा व इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा शेतीमध्ये प्रभावी वापर करण्याचे तंत्र विकसित केले जाते. ऊर्जा निर्मिती आणि अन्न उत्पादन यांचा समन्वय साधणाऱ्या तंत्रज्ञानावरही संशोधन केले जाते.

कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामार्फत कापणीनंतरचे तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, धान्य साठवण, मूल्यवर्धन, ऊर्जा व्यवस्थापन तसेच कृषि उत्पादनांच्या प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या विकासावर भर दिला जातो.

आजच्या काळात कृषि क्षेत्रातील यांत्रिकीकरणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आधुनिक कृषि यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळे शाश्वत व तंत्रज्ञानाधारित शेतीसाठी कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

आधुनिक अभ्यासक्रम व संशोधन

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल क्रांतीची आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात अनेक आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अचूक शेती (Precision Agriculture), डेटा विश्लेषण (Data Analytics), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, रिमोट सेन्सिंग, ड्रोन तंत्रज्ञान, उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण (Satellite Imagery) तसेच डिजिटल फार्म व्यवस्थापन प्रणाली (Digital Farm Management Platform) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश असून त्यानुसार संशोधनाची दिशा निश्चित करण्यात येत आहे.

संशोधन व कौशल्य विकास प्रकल्प

सध्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कृषि यंत्रसामग्री निर्मिती, प्रशिक्षण व चाचणी केंद्र कार्यरत आहे.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि सीएनएच इंडस्ट्रियल (CNH Industrial) यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत कौशल्य विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत कृषि यांत्रिकीकरणासंदर्भात ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या अर्थसहाय्याने भरड धान्य व इतर धान्यांपासून नाविन्यपूर्ण मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या संशोधनाचा प्रकल्प सुरू आहे. याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित स्मार्ट हायड्रोपोनिक्स या भविष्यातील नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानावरही संशोधन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

खाजगी उद्योगांसोबत भागीदारीचे प्रभावी धोरण तयार करून कृषि-आधारित उद्योगसमूहांशी सामंजस्य करार (MoU) करणे, तसेच कृषि यांत्रिकीकरण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी सहकार्याची सांगड घालून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव, इंटर्नशिप आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. या अनुषंगाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत नाहेप (NAHEP) संशोधन प्रकल्पामार्फत ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित २१ दिवसांचे तसेच ६ महिन्यांचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.

शेतकरी बांधवांना ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करता यावा यासाठी विद्यापीठामार्फत विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनद्वारे पीक फवारणीची २० प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांना माफक दरात ड्रोनद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने Wow Go Green या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून, त्याद्वारे भाडेतत्त्वावर ड्रोन फवारणीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना ड्रोन उड्डाण प्रशिक्षण, ड्रोन संचालन कौशल्य तसेच आवश्यक परवाना (License) प्राप्त करण्यासाठी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे आरपीटीओ (RPTO) प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅकथॉन पुणे–२०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विविध पारितोषिके प्राप्त केली आहेत. तसेच महाविद्यालयातील आचार्य पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. विशाल काळबांडे यांना अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान प्राप्त झाला आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची विविध नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये परिसर मुलाखतीद्वारे (Campus Placement) प्रतिष्ठित पदांवर निवड होत आहे.

महाविद्यालयाचा परिसर निसर्गरम्य असून, आधुनिक अभ्यासक्रमानुसार सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे व सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच उच्चशिक्षित, अनुभवी व संशोधनाभिमुख प्राध्यापकवृंद विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व मार्गदर्शन देत आहेत.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात डिजिटल व शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपकरणांच्या विकासाकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'सक्षम केंद्र' महाराष्ट्र शासनाच्या अर्थसहाय्याने मंजूर झाले आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात आले असून, या संशोधन केंद्राचे कार्य लवकरच सुरू होणार आहे.

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषि विकास व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना अधिकाधिक सेवासंधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कृषि अभियांत्रिकीचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने प्रत्येक राज्यात कृषि अभियांत्रिकीचा स्वतंत्र संवर्ग स्थापन करण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे भविष्यात मृद व जलसंधारण, सिंचन विकास, जलव्यवस्थापन तसेच कृषि पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रांत कृषि अभियंत्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

सध्याच्या काळात कृषि अभियंत्यांना त्यांच्या ज्ञान व कौशल्याच्या बळावर नवसंजीवनी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संवर्ग अस्तित्वात आल्यास पदसंख्येत वाढ होईल. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, अचूक शेती (Precision Farming), ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित कृषि यंत्रणा, स्मार्ट सिंचन व्यवस्था आणि डिजिटल कृषि या नव्या क्षेत्रांमध्येही कृषि अभियंत्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शासनाच्या विविध योजनांमध्ये नवीन पदनिर्मिती झाल्यामुळे कृषि अभियंत्यांसाठी सेवेच्या संधी अधिक व्यापक होतील.

कृषि अभियांत्रिकीचे आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय शेतीत प्रभावीपणे वापरले गेले, तर भारतीय शेती अधिक समृद्ध, उत्पादक आणि शाश्वत होईल. कृषि अभियंत्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास निश्चितच हातभार लागेल. त्यामुळे भारतीय शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी कृषि अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

याच अनुषंगाने, उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेऊन आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कृषि विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राहुल रामटेके (मोबाईल क्रमांक ७५८८०८२८६५ ) किंवा कृषि अभियंता श्री लक्ष्मीकांत राउतमारे (मोबाईल क्रमांक ९४०४४९४८६६) यांच्याशी संपर्क साधावा.