वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी दिनांक १९ जुलै २०२६ रोजी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्यासमवेत
विद्यापीठातील विविध संशोधन प्रक्षेत्रांना भेट देऊन खरीप हंगामातील पेरणी तसेच
वृक्षलागवड कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील
सोयाबीन न्यूक्लियस ब्लॉक, वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने
सुरू असलेल्या वृक्षलागवड क्षेत्रासह खानापूर 'अ' व 'ब' प्रक्षेत्र तसेच शेंद्रा
'अ' प्रक्षेत्राला भेट देऊन सुरू
असलेल्या व पूर्ण झालेल्या पेरणीची, पीक व्यवस्थापनाची आणि
वृक्षलागवडीच्या प्रगतीची पाहणी केली.
माननीय कुलगुरूंनी संबंधित प्रक्षेत्रांवरील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा
सविस्तर आढावा घेतला. पावसाच्या परिस्थितीनुसार पिकांची योग्य निगा राखणे, वेळेवर आंतरमशागत करणे, संशोधन
प्रक्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे व्यवस्थापन कायम ठेवणे तसेच वृक्षलागवडीची नियमित
देखभाल करून लागवड केलेल्या रोपांचे शंभर टक्के संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या
उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी विविध प्रक्षेत्रांवरील
पेरणीची सद्यस्थिती, संशोधन प्रयोगांची अंमलबजावणी तसेच
वृक्षलागवड मोहिमेच्या प्रगतीची माहिती माननीय कुलगुरूंना दिली. विद्यापीठाच्या
संशोधन प्रक्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सर्व कामे सुरू असून खरीप हंगामातील
विविध संशोधन प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनिल उमाटे तसेच संबंधित प्रक्षेत्रांवरील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीमुळे संशोधन प्रक्षेत्रांवरील पेरणी, संशोधन उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या
वृक्षलागवड कार्यक्रमाला अधिक गती मिळेल, असा विश्वास
उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
.jpeg)


