Saturday, September 19, 2026

माननीय खासदार डॉ. रामराव वडकुते यांची वनामकृविच्या अत्याधुनिक सामायिक व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्रास (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील अत्याधुनिक सामायिक व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्रास (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) राज्यसभा सदस्य माननीय खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध उपक्रम व प्रक्रिया उद्योगांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी गूळ निर्मिती प्रकल्प, ऊस रस बाटलीबंद (बॉटलिंग) युनिट तसेच मसाला प्रक्रिया युनिटची पाहणी करून तेथील कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या विविध संधींची माहिती घेतली. कृषि क्षेत्रातील उत्पादनांना प्रक्रिया व मूल्यवर्धनाची जोड देऊन शेतकरी, युवक तसेच उद्योजकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यामध्ये अशा केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी माननीय खासदार डॉ. रामराव वडकुते यांचे स्वागत करून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण तसेच शेतकरी हिताच्या उपक्रमांची माहिती दिली. कृषि क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन, उद्योजकता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली.

या भेटीप्रसंगी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, चेंबर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम बिझनेस, मुंबईचे सचिव डॉ. उमेश कांबळे, उपाध्यक्ष्य श्री गोविंद सूर्यवंशी तसेच विद्यापीठातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी सामायिक व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची, विकसित तंत्रज्ञानांची तसेच शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उद्योजकता निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माननीय खासदार डॉ. रामराव वडकुते यांना सविस्तर माहिती दिली.

माननीय खासदार डॉ. वडकुते यांनी केंद्रामार्फत सुरू असलेल्या प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या उपक्रमांची माहिती घेत विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक केले.