Tuesday, June 21, 2022

वनामकृवित जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढ, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, आज संपुर्ण जगात योग दिन साजरा करण्‍यात येत आहे. नियमित योगाचा सराव केल्‍याने जीवनातील ताणतणाव कमी होण्‍यास मदत होते. व्‍यक्‍ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतो. योग व आसन हे आपल्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असे ते म्‍हणाले.

याप्रसंगी ऑर्ट ऑफ लिविंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी, डॉ सुब्बाराव, शरद डोलारकर, सुनिल बोरवते, महेश दशरते, गजानन कोरळवार, देवश्री हमदापुरकर, अर्चना घनवट आदींच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसने, प्राणायाम आदींचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. 

कार्यक्रमात योगशिक्षण शरद डोलारकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात डॉ सचिन मोरे यांनी यावर्षीच्‍या जागतिक योग दिनाचे घोष वाक्‍य मानवतेसाठी योग असल्‍याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक आदींनी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयातील डॉ डी एफ राठोड, डॉ चव्‍हाण आदीसह कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.






Sunday, June 19, 2022

ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे मंगरूळ येथे पशु लसीकरण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय, रेशीम संशोधन केंद्र आणि जिल्हा पशु वैदयकिय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यकम अंतर्गत दिनांक १५ जून रोजी मौजे मंगरूळ (ता. मानवत) येथे घटसर्प व फऱ्या रोग प्रतिबंध पशु लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जमीर पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. एम. मार्कंडेय उपस्थित होते. पशु पराजीवीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नरळदकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. मोहम्मद माजीद, डॉ. दिपाली कांबळे, डॉ. पी. आर. पाटील, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. आर. के. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम घोळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात पशु लसीकरणाचे महत्व यावर डॉ. एन. एम. मार्कंडेय यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. नारळदकर यांनी ५ टक्के निंबोळीचा अर्क वापर करुन गोचीड निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सद‍र कार्यक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल,रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, सहसमन्‍वयक डॉ प्रविण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्‍यात आला होता. लसिकरण कार्यक्रमांतर्गत गावातील पशूंचे मोफत लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम घोळवे यांनी केले. सूत्रसंचलन डी डी माने  यांनी केले तर आभार वी एन लोंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  कृषीकन्या के. जी. पन्नमवाड, बी. एम. माने, पी. ए.मोकाशे, टी टी.मुनघाटे, पी.के मगर, पी. एस.मगर, वी.बी.माने, जे.पी.मोरे, वी.एम.नखाते, पी. एम.पदमगीरवार, एच.वी.पांगरकर, एच.एस.पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.


Saturday, June 18, 2022

वनामकृविच्‍या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात सीताफळ फळपिकांची दर्जेदार कलमे रोपे विक्रीस उपलब्ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात सिताफळाच्‍या धारूर ६ या वाणाची रोपे विक्रीकरिता उपलब्‍ध आहेत. मराठवाडा विभागच नव्हे तर राज्याच्या कोरडवाहू  शेतीसाठी लाभदायी ठरलेले फळपीक म्हणजे सीताफळ होय आणि सीताफळाच्‍या विविध उपलब्ध वानामधून सर्वात सरस ठरलेला असा धारूर ६ या वाणाची  रोपे विक्री करिता उपलब्ध असल्‍याची माहिती केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ गोविदरराव मुंढे यांनी दिली आहे. धारूर ६ हे वाण वर्ष २०१४ मध्ये लागवडीसाठी या केंद्राकडून शिफारस करण्यात आली. मागील आठ वर्षात राज्यातील शेतकरी बांधवा हे वाण मोठे प्रचलित झाले आहे. या वाणाची फळांना प्रक्रिया उद्योगात मोठी मागणी होत असल्‍यामुळे आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर ठरले आहे. वाणाच्या पक्व फळांचे वजन ४०० ग्रॅम पेक्षाही जास्त असुन फळात साखरेचे प्रमाण १९.५ आणि घनद्रव्य पदार्थ २४.५  असल्याने बियाचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत कमी आहे आणि गर जास्त आहे. यामुळे खाण्यास योग्‍य आणि प्रक्रिया उद्योगात यास मागणी असुन रबडी, आईस्‍क्रीम अशा अनेक पदार्थात याच्‍या गराचा वापर होतो. तसेच अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी फळे मिळण्यास सुरुवात होते. विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्‍यात आली असुन शेतक-यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहे, अशी माहिती सिताफळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली. डॉ गोविंद मुंढे यांचा संपर्क क्रमाक ८२७५०७२७९२ आहे.

वनामकृवि विकसित ज्‍वार वाणाच्‍या बियाण्‍याचे आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत ज्वार सुधार प्रकल्पाच्‍या  आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत दिनांक १६ जुन परभणी तालुक्यातील मौजे जांब, सनपुरी, रायपुर आदी गावांतील निवडक शेतक-यांना खरीप ज्वारीचे बियाणे, बीजप्रक्रियेकरिता गाऊचु व ट्रायकोबुस्टचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ ज्वार पैदासकार डॉ. के. आर. कांबळे तर ज्वार पैदासकार डॉ. एल. जावळे, ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ. मोहम्मद ईलियास, ज्वार कृषिविद्यावेत्ता डॉ. प्रितम भुतडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. के. आर. कांबळे यांनी ज्वारी पिकाचे मानवी आहारातील महत्व व दुध व्यवसायात जनावरांकरिता कडब्याचे महत्व सांगितले. डॉ. एल. एन. जावळे यांनी विद्यापीठ विकसित ज्‍वारीचे वाण परभणी शक्ती व सीएसएच ४१ बाबत माहिती देऊन ज्‍वारी लागवड तंञज्ञानाबाबत मार्गदर्शन केले तर डॉ. मोहम्मद ईलियास यांनी खोडमाशी, खोडकिड, अमेरिकन लष्करी अळी, हुमनी, मावा आदी किडीच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करून बीजप्रक्रिया करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. तसेच डॉ. प्रितम भुतडा यांनी आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजने बद्दल माहिती देऊन जिओ टॅगिग करण्‍याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले. सदरिल कार्यक्रम संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. कार्यक्रमास जांब, सनपुरी, रायपुर आदी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Friday, June 17, 2022

मौजे कोल्‍हावाडी येथे घटसर्प व फ-र्या रोग प्रतिबंध पशु लसीकरण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय, रेशीम संशोधन केंद्र आणि जिल्‍हा पशुवैद्यकिय विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दिनांक १५ जुन रोजी  मौजे कोल्‍हावाडी (ता. मानवत) येथे घटसर्प व फ-र्या रोग प्रतिबंध पशू लसीकरण कार्यक्रम राबविण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी माजी सरपंच श्री विठ्ठल भिसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल उपस्थित होते. पशू परजिवीशास्त्र विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब नरळदकर, पशुधन विकास अधिकारी डॉ मोहम्मद माजीद, डॉ दिपाली कांबळे, डॉ पी आर पाटील, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ चंद्रकांत लटपटे, डॉ रमेश पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत लाड, मुंजाजी भिसे, गोंविद भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

कार्यक्रमात पशु लसीकरणाचे महत्‍व यावर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी मार्गदर्शन केले. तसेच रेशीम उद्योगाबाबत आयोजक डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. डॉ बालासाहेब नरळदकर यांनी 5 टक्के निंबोळीचा अर्क वापरुन गोचीड निर्मुलना बाबत मार्गदर्शन केले.  

लसीकरण कार्यक्रमांतर्गत गावातील पशुंचे मोफत लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत लाड यांनी केले. सुत्रसंचलन कृषिकन्या राजनंदिनी कदम तर आभार के. डी. खैरे यांनी मानले. प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल आणि रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनानुसार ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावेच्‍या कृषिकन्या काळे, जाधव, कुलकर्णी, इंगळे, जैस्वानी, क-हाळे, लगड, कणखर आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणासाठी व्यक्तीची मानसिकता बदलणे आवश्यक ……. इंजि. शंकर आजेगावकर

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियान संपन्न

प्रत्येक देशाच्या भवितव्यासाठी पाणी, ऊर्जा, स्वास्थ्य, कृषी, जैवविविधता आदीबाबत प्रत्येक नागरिकांनी सजग राहणे नितांत गरजेचे असुन पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात उचित बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलमित्र इंजि. शंकर आजेगावकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहानिमित्‍त विविध उपक्रम राबविण्‍यात आले, या अभियानाच्‍या समारोपाप्रसंगी दिनांक १३ जुन रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ जया बंगाळे या होत्‍या तर कार्यक्रमास जलमित्र प्रतिष्ठान परभणीचे संस्थापक डॉ. राजगोपाल कालानी, जलमित्र डॉ. रवींद्र मुळे, श्री. रुस्तुम कदम, श्री. उमेश पाचलींग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात जलमित्र डॉ. राजगोपाल कालानी, जलमित्र डॉ. रवींद्र मुळे, श्री. रुस्तुम कदम, श्री. उमेश पाचलींग याच्‍या पर्यावरण संरक्षणासाठी असलेल्या बहुमोल योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनवर यांनी केले, आभार डॉ निता गायकवाड यांनी मानले. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, झाडांना आच्छादन, पालापाचोळयापासून गांडूळ खत निर्मिती, पर्यावरण संरक्षणाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन, जनजागृती प्रभात फेरी, ‘आम्ही पर्यावरण रक्षक’ पथनाट्य आदीं विविध उपक्रम महाविद्यालयाच्‍या रासेयोच्‍या कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनवर यांच्‍यासह स्‍वयंसेवकांनी विविध राबविले. कार्यक्रमास डॉ. शंकर पुरी, डॉ. सुनिता काळे, डॉ. तस्नीम नाहिद खान, डॉ. माधुरी कुलकर्णी आदीसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांचे सहकार्य लाभले.




Thursday, June 16, 2022

वनाममकृवितील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास अतिशय कार्यतत्पर केंद्राचा विशेष पुरस्कार प्रदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील अतिशय कार्यतत्पर संशोधन केंद्र हा विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थेत २ ते ४ जून दरम्यान अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध केंद्राची व्दिवार्षिक कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. सदरिल कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी मान्‍यवरांच्या हस्ते पुरस्‍कार डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. पपीता गौरखेडे आदींनी स्विकारला.

कार्यशाळेत देशभरातील एकूण ३२ कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी हैद्राबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्‍य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रविणराव, केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, मोदीपुरम येथील एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेचे डॉ. सी. आर. मेहता, नागपुर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, प्रकल्प समन्वयक डॉ. जी. रविंद्र चारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदरिल संशोधन केंद्राच्‍या वतीने कोरडवाहू आधारीत शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध संशोधन प्रयोग घेण्यात येवून शेतकरी बंधूंना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच या संशोधन केंद्रामार्फत मागील १० वर्षापासून हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती ही योजना देखील राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर आधारीत पिकांच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येते. या कार्याची दखल घेऊन स‍दरिल पुरस्‍काराकरिता केंद्राची निवड करण्‍यात आली. पुरस्काराबद्दल संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम आदींनी प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले.