Thursday, August 29, 2024

वनामकृविचे कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि प्रख्यात अभियंता पुरस्काराने सन्मानित

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांना जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था, इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), द्वारे “प्रख्यात अभियंता पुरस्कार (इमीनन्ट इंजिनिअर आवार्ड)” छत्तीसगढ राज्याचे कृषी मंत्री माननीय ना. श्री राम विचार नेताम यांच्या शुभहस्ते छत्तीसगढ येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, येथे दिनांक २९-३० ऑगस्ट दरम्यान आयोजित "कृषी अभियांत्रिकी : ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शाश्वत विकासाची वाटचाल" या विषयावरील राष्ट्रीय कृषी अभियंता अधिवेशन आणि राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देणारी इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), IEI ही भारतातील अभियंत्यांची राष्ट्रीय संस्था असून जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था आहे. याचे १५ अभियांत्रिकी शाखांमध्ये दहा लाखांहून अधिक सदस्य असून संस्थेची स्थापना १९२० मध्ये कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाली होती आणि १९३५ मध्ये रॉयल चार्टरद्वारे तिचा समावेश करण्यात आला होता. सध्या तिचे मुख्यालय ८ गोखले रोड, कोलकाता येथे आहे. या संस्थेने कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांना त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि उपलब्धींची दखल घेत दिला आहे.

कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि हे २५ जुलै २०२२ पासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र) येथे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. याआधी, त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथे उप संचालक (संशोधन), नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शाळेचे समन्वयक, संरक्षित शेती तंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

आपल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या दीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी कृषी अवशेष व्यवस्थापन, कोरडवाहू शेती, भाजीपाला यांत्रिकीकरण, लहान शेतातील यांत्रिकीकरण आणि खतांचा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपकरणांच्या विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी विकसित आणि विस्तार केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार देशातील १९ पेक्षा जास्त राज्यांमध्ये झाला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), कानपूर यांच्या सहकार्याने त्यांनी डिझाइन इनोव्हेशन सेंटर स्थापन केले, जे नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्लीच्या ईशान्येकडील राज्यांतील (सर्व सात राज्ये), टीएसपी (मध्य प्रदेश) आणि एमजीएमजी (उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली) कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी योगदान दिले आहे.

तसेच त्यांनी शेतकरी केंद्रित यांत्रिकीकरण धोरणांचे समर्थन आणि विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यासाठी त्यांनी कृषीमध्ये ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित करण्यासाठी समितीचे संयोजक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या, ते पिकांच्या पोषक तत्त्वांच्या ड्रोन-आधारित अनुप्रयोगांसाठी, ज्यात नॅनो फॉर्म्युलेशनचा समावेश आहे, मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित करण्यासाठीच्या ड्रोन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारयांच्या कार्यक्रमांतर्गत शेती तंत्रज्ञानाशी संबंधित नवकल्पक आणि स्टार्ट-अप्सच्या मार्गदर्शनात सक्रियपणे भाग घेतला आहे. तसेच, ते कृषी पोषणासाठी तंत्रज्ञान नवोपक्रम मंच (TIFAN) मध्ये सक्रियपणे सहभागी होते.

कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्या उत्कृष्ट योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि या  नवीन प्रख्यात अभियंता पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्यामुळे विद्यापीठात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले. या सन्मानाबद्दल विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ यांच्या सह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


एक पेड मॉ के नाम अभियानात वनामकृविद्वारा २८१० वृक्षांची लागवड

 कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनात अभियानामध्ये अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भारताचे माननीय पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आईच्या नावाने एक झाड –एक पेड मॉ के नाम – Plant4Mother हे अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील परिसरात तसेच विद्यापीठाच्या संपूर्ण मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांनी दिनांक २९ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण केले. या जागतिक अभियानात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर, उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्या शुभहस्ते वैद्यनाथ वसतीगृहाच्या मैदान परिसरात त्यांनी त्यांच्या आईसाठी वृक्षारोपण केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बीड जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावले आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  कुलसचिव डॉ संतोष वेणीकर यांनी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात व कृषीतंत्र विद्यालयात आणि सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे यांनी पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागात वृक्षारोपण केले. तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात देखील सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक-एक झाड लावले. याबरोबरच विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य, तसेच इतर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात तसेच प्रक्षेत्रावर त्यांच्या आईच्या नावाने वृक्षारोपण केले. या जागतिक मोहिमे अंतर्गत विद्यापीठातील एकूण ३५०  अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग घेतला व त्यांनी एकूण २८१० वृक्षांची लागवड केली. या अभियानातून विद्यापीठामध्ये वृक्षरोपणाची एक चळवळ सुरू झाली असून विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षारोपण करून आपल्या मातेला तसेच पृथ्वीमातेला मानवंदना दिली.

या अभियानांतर्गत सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा प्रयत्न केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे केला जात असून याद्वारे हे उद्दिष्ट देखील पूर्ण होत आहे तसेच वृक्ष लागवडीतून माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होत आहे.

















Wednesday, August 28, 2024

प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांद्वारा वनामकृवितील महादेवाचा महाभिषेक

 विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाठी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनीही केली महादेवाची पूजा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेवेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून रुजू झालेल्या एकशे एकतीस कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी नियमाकुल करण्यासाठीचा मुद्दा कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या कर्मचारी केंद्रित धोरणानुसार त्यांनी शासनाकडे मार्गदर्शनासाठी पत्र पाठवून व त्यास यश मिळविले आणि त्यांच्या परिविक्षाधीन कालावधी, नियमातील आवश्यक तरतुदींची काटेकोर पूर्तता करून घेऊन नियमाकुल करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी उत्साहित होवून मनोभावातून पवित्र श्रावण महिन्यात दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठातील मृत्युंजय गवळेश्वर  महादेवाचा महाअभिषेक कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत केला. यावेळी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनीही विद्यापीठाचा सर्वांगीण विकास, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि त्यांचा उत्कर्ष, सर्वाना चांगले आरोग्य, आनंद आणि सर्वामध्ये एकजूट राहून सौहार्द भावना निर्माण व्हावी यासाठी सद्भावनेने मृत्युंजय गवळेश्वर महादेवाची पूजा केली. यावेळी प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाचा लाभ विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच परभणी शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी कौतुक केले आणि आयोजक सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांचे जवाहर नवोदय विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरातील पीएम श्री शाळा जवाहर नवोदय विद्यालय येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी विज्ञान ज्योती कार्यक्रमांतर्गत प्रेरणादायक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू मा. डॉ  इन्द्र मणि हे होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी उत्तम शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शालेय शिक्षण हे आपले व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. आपला देश कृषि प्रधान असल्याने आपण भविष्यात कृषि आणि सलग्न शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रम घेवून शेतीविकासास चालना देवू शकतो. तसेच शालेय शिक्षणासोबतच अनुभवातून मिळणारे शिक्षणदेखील दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असते त्याचेही आपण आत्मसात करणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आदर्श नागरिक बनून राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करू शकणार आहोत, असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. व्ही. बोभाटे, वरिष्ठ अध्यापक श्री. डी. के. जुमडे श्री. व्ही. ए. पोघे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्रीनिवास करखेलिकर, वामन कनगरकर, रमेश मटकमवाड, प्रबोध मडावी, प्रियंका कैरी व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.जी. भोरगे यांनी केले.




Monday, August 26, 2024

सहा दिवसीय परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा यशस्वी समारोप

 शेतकरी केंद्रीत विद्यापीठांचे संशोधन आणि विस्तार कार्य... कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि

समारोपात शेतकऱ्यांचा उल्लेखनीय कार्याचा मान्यवरांचा शुभहस्ते यथोचित सन्मान


महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२४  या कालावधीत राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांच्‍या संकल्‍पनेतुन आणि मार्गदर्शनाखाली तसेच कृषी विभागाच्‍या पुढाकाराने  परळी वैजनाथ (बीड) येथे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्‍सव – २०२४ यशस्वी संपन्न होवून समारोप दिनांक २६ ऑगस्ट रोजी झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. तर बीडचे जिल्हाधिकारी मा. श्री अविनाश पाठक (भाप्रसे), आत्माचे संचालक मा श्री. अशोक किरनळ्ळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती संगीतादेवी पाटील, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विभागीय कृषी सहसंचालक मा श्री साहेबराव दिवेकर (लातूर), डॉ तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री एस. डी. गरांडे, परळीचे तहसिलदार श्री. व्यंकटेश मुंडे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात लाडकी बहिण याजानेचे बीड जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष श्री वाल्मिकअण्णा कराड यांनी विशेष परिश्रम घेतले.  

कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा शुभहस्ते शेतीव्यवसायात उल्लेखनिय कार्य केलेल्या तसेच यशस्वी शेतकऱ्यांचे आणि प्रदर्शनातील मुख्यमंत्री लाडकी बहिण, जिवंत नमुने ठेवलेले याबरोबरच शिवाभोजन दालानाधारक, परळीचा शिक्षण विभाग तसेच महोत्सवात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.    

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी देवो भव या भावनेने शेतकरी केंद्रीत संशोधन आणि विस्तार कार्य करीत असून भविष्यात विद्यापीठ राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, प्रगतशील शेतकरी, यांच्यात इतर राज्याहून उत्कृष्ठ असा समन्वय असल्याने शेती विकासासाठी विस्तार यंत्रणेचे उत्कृष्ट मॉडेल बनविण्यासाठी अधिक प्रयत्नशील असेल असे नमूद केले. तसेच राज्यातील चारही कृषि विद्यापीठे शेतकरी कल्याणासाठी समर्पित असून शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी सदैव तत्पर आहेत. याबरोबरच विद्यापीठाद्वारे महत्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले जाते. ते शेतकऱ्यांना प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असून यासाठी विद्यापीठ विविध उपक्रम राबवीत आहे. यात विद्यापीठाने पारंपारिक विस्तार पद्धतीला जोड देत विविध सामाजिक माध्यमांचा उपयोग करून शेतकरी - शास्त्रज्ञ संवाद दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी सातत्याने आयोजित करत आहे. त्यामध्ये नाविन्यता ठेवून विविध विषयावर मार्गदर्शन आयोजित करून वृद्धिगत करण्यात येत असून यात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाचे मोठे योगदान आहे. या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादात दोन्ही बाजूने संवाद होतो आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळते म्हणून कृषी क्षेत्रात हा कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवावा आणि शाश्वत शेती उद्योगास चालना द्यावी. याबरोबरच परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्‍सव – २०२४ यशस्वी संपन्न झाला आणि याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना झाला म्हणून असे कार्यक्रम नियमित आयोजित व्हावेत अशी अशा व्यक्त करून त्यांनी आयोजकांचे तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे आणि प्रदर्शनातील दालनधारकांचे अभिनंदन केले.

या कृषी महोत्सवाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात झाला असल्याने या विद्यापीठाचा विशेष सहभाग होता. यासाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी  संपूर्ण सहा दिवसाचे नियोजन केले आणि विद्यापीठाने या महोत्सवातील प्रदर्शनामध्ये तेरा दालने उभारली होती. या दालनासह इतर विद्यापीठांच्या दालनास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी भेट देवून निरीक्षण केले. तसेच महोत्सवात दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचे आयोजनाद्वारे विविध विषयावर शास्त्रज्ञ व तज्ञ व्यक्ती यांचे शेतकऱ्यांशी यशस्वी सुसंवाद  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी घडवून आणला यासाठी आयोजकांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमामध्ये आत्माचे संचालक मा श्री. अशोक किरनळ्ळी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक छत्रपती संभाजीनगरचे कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे यांनी केले.  बीडचे पोलीस अधीक्षक मा श्री अविनाश बारगळ (भापोसे) यांच्या नियंत्रणाखाली महोत्सवात सुरक्षततेच्या यशस्वी उपाययोजना केल्या होत्या. या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, इत्यादींची उत्पादित वस्तू , खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत ४०० हून अधिक दालनात करण्यात आलेले होते. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम झालेले संशोधन यांची देखील माहिती महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यातआले. तसेच रानभाजी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सुत्रांचालन मंडळ कृषि अधिकारी मंजुश्री कवडे यांनी तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे यांनी मानले. महोत्सवास राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच  नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि  शेतकरी बांधवांसाठी हा महोत्सव एक मोठा लाभदायक ठरला आणि या महोत्सवात त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.