Monday, January 6, 2025

अन्नतंत्र महाविद्यालयात पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

 उद्योगात अडचणींवर मात करण्यासाठी धैर्य आणि योग्य विश्लेषणाची गरज... कुलगुरू मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय आणि हैद्राबाद येथील एसीएबीसी मॅनेज यांच्या संयुक्त विद्यमाने "अन्न प्रक्रिया मूल्यवर्धन" या विषयावर पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जानेवारी रोजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हैद्राबादच्या केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, उत्तर प्रदेशच्या मोदीपुरम येथील भारतीय कृषि पद्धती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर आणि एसीएबीसी मॅनेज सल्लागार डॉ. भावाजंली आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू आणि पुडुचेरी या पाच राज्यांतील २५ कृषि उद्योजकांनी नाव नोंदणी केली आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मेहनतीसह उद्योजकतेला जोपासण्याचे महत्त्व सांगितले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी उद्योगात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी धैर्य आणि योग्य विश्लेषणाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. व्ही. के. सिंग यांनी कोरडवाहू पिकांच्या क्षमतेवर भर देत हरित ऊर्जा शाश्वत शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. सुनील कुमार यांनी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचे पौष्टिक सुरक्षा राखण्यात आणि आत्मनिर्भर भारत योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात असलेले योगदान अधोरेखित केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेसाठी शुभेच्छा दिल्या, तर डॉ. अनुप्रिता जोशी आणि डॉ. भानुदास पाटील यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन डॉ. प्रिती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारीवर्गाने सहकार्य केले.


वनामकृविचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा

परभणी जिल्ह्यात दर्पण दिन साजरा : ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव

भारताची लोकशाही जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही   -कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिन ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ शारदा महाविद्यालयात मोठ्या उत्साहात दिनांक ६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार डॉ. आसाराम लोमटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रविंद्र सिंह परदेशी, प्राचार्य डॉ. बबन पवार, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे सामाजिक कार्यकर्ते भारत नांदुरे आदींची उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेचे समाजघडणीत महत्त्व विशद केले. पुढे ते म्हणाले की, भारताचं नाव हे जगाच्या पटलावर जेव्हा येते, तेव्हा इतर देशातील लोकांना आपल्या  भारत देशाचा अभिमान वाटतो भारतातील लोकशाही ही आज जगात सर्वोत्कृष्ट  लोकशाही आहे, त्यामुळे भारतातील लोकांना इतर देशांमध्ये आदराचे स्थान आहे. या लोकशाहीला टिकविण्याचं काम भारताचा चौथा स्तंभ पत्रकार ही उल्लेखनीय भूमिका  निभावत  असतात. पत्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बळकटी देत असून, जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतात असे नमूद करून त्यांनी सत्कारमूर्ती आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी पत्रकारितेच्या विविध पैलूंवर आपले विचार मांडले. पत्रकार संघ शारदा महाविद्यालयाने संयुक्तपणे हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे संयोजन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाने केले असून, हा दिवस परभणी जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.