सर्व परभणीवासीयांना कळविण्यात येते की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात सकाळी फिरण्यास येण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही बंदी घातली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठात सकाळी फिरण्यास / व्यायामासाठी येणाऱ्या जनतेची नोंद ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने भविष्यात ओळखपत्राची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठात फिरण्यास येणाऱ्या महिला, वयस्कर, लहान मुलांची सुरक्षा ठेवणे सोयीचे होईल. सकाळी ५.०० ते ८.०० वाजेपर्यंत विद्यापीठात प्रवेश करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे. जेणेकरून फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही. विद्यापीठ परिसरात फिरण्यास विद्यापीठ प्रशासनाने बंदी घातली आहे अशा अफवावर परभणीकरांनी विश्वास ठेवू नये. विद्यापीठ परिसरात फिरण्यास येणारे सर्व नागरिक विद्यापीठाचे स्वयंसेवक असून आपण विद्यापीठाचे स्वच्छता दूत आहात यात शंका नाही. म्हणून आपण विद्यापीठ परिसराचे रक्षण कराल व विद्यापीठ परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत कराल अशी विद्यापीठ प्रशासनाला आपल्याकडून अपेक्षा आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Monday, September 9, 2024
Saturday, September 7, 2024
वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे सद्यस्थितीत कापूस पिकाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
शेतकऱ्यांना सद्यस्थितीत अचूक व नेमके तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ सप्टेंबर रोजी सद्यस्थितीत कापूस पिकाचे
व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन कुलगुरू
मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी माननीय कुलगुरू म्हणाले की, कार्यक्रमात दुहेरी संवाद ठेवून
शेतकऱ्यांना सद्यस्थितील शेतीसमस्या विचारून त्यावर सोप्या पद्धतीने अचूक व नेमके तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे. या
संवादाची उपयुक्तता वाढत असल्यामुळे विद्यापीठाद्वारे
पुढील पंधरा दिवस नियमित कार्यक्रम घेण्यात येतील. सध्या शेती मध्ये
व्यवस्थापनासाठी जाता येत नाही, याकरिता विद्यापीठाने माफक दरात ड्रोन फवारणी
सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी वरीष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी सद्यस्थितीत कापूस पिकाची अवस्था. डोमकळी, पातेगळ होणे समस्या व त्याचे व्यवस्थापन. बोंडे विकसित
होण्यासाठी उपाययोजना. संभाव्य कीड, रोग व पिक संरक्षण.
अन्नद्रव्य कमतरता व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. प्रभारी अधिकारी डॉ. हरीश
आवारी यांनी जमिनीमध्ये वापसा येण्यासाठी निचरा ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी पीक
लागवडी पूर्वीच नियोजन होणे आवश्यक असते परंतु सध्या ज्या जमिनीमध्ये पाणी पातळी
वाढली आली आणि जमिनीच्या मुळासी पाणी साचलेले आहे. या करिता इतर शेतीस अडचण
निर्माण होऊ न करता छोटे छोटे चर काढावेत आणि आपल्या शेतातील पाणी बाहेर काढावे.
तसेच आपल्या बोअर आणि विहिरीतील पंप सुरु करून जमिनीतील पाणी बाहेर नाल्यात सोडावे
असे सुचविले.
कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमामध्ये बहुसंखेने शेतकरी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीविषयक विविध समस्या मांडल्या त्यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ, डॉ हरीश आवारी, डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. आनंद गोरे यांनी उत्तरे देऊन समाधान केले. तसेच प्रयोगशील शेतकरी श्री अनिल सूर्यवंशी यांनी नियंत्रणासाठी तयार केलेला प्रकाश सापळा दाखवून त्याची उपयुक्तता नमूद केली. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंग, यु टूब, फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.
ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवादाची उपयुक्तता वाढली
प्रादुर्भावाचे तात्काळ निदान करणे आवश्यक ... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या
कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या
क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी -
शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा दहावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा
विषय असून केंद्रीय आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना
दिलासा दिला आहे. यासोबतच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. अतिवृष्टीमुळे
उद्भवणाऱ्या विविध प्रकारचे कीड रोग नियंत्रण, जमिनीतील निचरा करण्यासाठीच्या
विविध उपाय योजना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नियमित मार्गदर्शनातून देत आहेत. कोणत्याही
प्रादुर्भावाचे वेळेतच निदान झाले तर ८० टक्के पिकाची बचत होते आणि उशिरा झाले तर
केवळ २० टक्केच बचत होते, म्हणून किडी व रोगांचे तात्काळ निदान कसे करावे याबाबतही
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. अतिवृष्टीमुळे उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता
आहे त्यासाठी उपाय योजना सुचवाव्यात असे सूचित केले. दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात
वाजता होत असलेल्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाची उपयुक्तता शेतकऱ्यांच्या
समस्या सोडविण्यासाठी वाढत आहे, म्हणून पुढील पंधरा दिवस हा कार्यक्रम दररोज राबवून
जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी मदत करण्यात
येईल. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे
प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.
तांत्रिक सत्रात हवामानाचा अंदाज डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितला. प्रभारी
अधिकारी डॉ. हरीश आवारी यांनी जमिनीमध्ये निचरा ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी पीक
लागवडी पूर्वीच नियोजन होणे आवश्यक असते परंतु सध्या ज्या जमिनीमध्ये पाणी साचलेले
आहे. या ठिकाणी इतर शेतीस अडचण निर्माण होऊ न करता छोटे छोटे चर काढावेत आणि आपल्या
शेतातील पाणी बाहेर काढावे असे सुचविले. कृषी विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार
यांनी सोयाबीन, तूर, कापूस यांच्या सद्यस्थितीतील पिकांचे योग्य संगोपन याबाबत
माहिती दिली. विशेष करून कापूस मर टाळण्यासाठी रासायनिक खताची आळवणी करण्याची तसेच
पीकासजर जमिनीतून खत मिळण्यास अडचण येत असेल तर १३:०:४५ सारख्या खताची पिकावर
फवारणी करावी. याबरोबरच पातेगळ रोखण्यासाठी विविध योजना उपायोजना सुचविल्या.
विभागीय कृषी
सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी त्यांच्या विभागातील अनेक मंडळात अतिवृष्टी झालेली
असून पिकामध्ये जाता येत नाही. पिकांना संरक्षणात्मक उपाय योजना करणे अशक्य होत
आहे. याकरिता ड्रोन-तंत्रज्ञानाचा फवारणीसाठी उपयोग करावा तसेच त्यांनी
शेतकऱ्यांतून आलेल्या वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वसंत-ऊर्जा या प्रॉडक्टमुळे
जमिनीमध्ये कोणताही ताण सहन करण्याची शक्ती निर्माण होते असे शेतकऱ्यांचे
प्रत्याभरणातून आलेले माहिती आहे म्हणून या प्रॉडक्टला शेतकऱ्यांनी वापरण्यासाठी
प्रोत्साहित करावे अशी विनंती केली.
कार्यक्रमात
प्रगतशील शेतकरी श्री विश्वनाथ दहे, श्री. त्रिंबक पाटील यांच्यासह अनेक
शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले त्यास अतिशय योग्य आणि समाधानकारक उत्तरे
विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. सूर्यकांत
पवार, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. हरीश आवारी तसेच विभागीय कृषी सहसंचालक डॉ.
तुकाराम मोटे यांनी उत्तरे दिली.
आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
Friday, September 6, 2024
वनामकृवित बाल्य रेशीम किटक संगोपन प्रशिक्षणाचे उदघाटन
रेशीम
उद्योगासारख्या शेतीपूरक जोडधंद्यास अनन्यसाधारण महत्व.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र
मणि
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजना तर्फे अयोजीत ८ दिवसीय कार्यशाळेचे दिनांक
५ सप्टेबर रोजी उदघाटन करण्यात आले. अध्यक्ष तथा उदघाटक म्हणून कुलगुरू मा. डॉ.
इन्द्र मणि हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शास्वत शेती उद्योगासाठी रेशीम
उद्योगासारख्या शेतीपूरक जोडधंद्यास अनन्यसाधारण महत्व आहे. रेशीम उद्योगातील
पहिला टप्पा म्हणजे बाल्य रेशीम किटक संगोपन. याबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती
मिळणे आवश्यक आहे त्यादृष्टीने या प्रशिक्षणाची महत्वाची भूमिका आहे. यावेळी
त्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षणाचे महत्व विषद केले. शिक्षण घेवून डॉ.
अब्दूल कलाम हे शास्त्रज्ञ झाले आणि त्यांच्या अनमोल योगदानामुळे पुढे ते देशाचे
राष्ट्रपती शिक्षणामुळेच झाले. याकरिता सर्व मुलां-मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे. देशाच्या
विकासात कृषीचाक्षेत्राचा मुख्य वाटा आहे म्हणून विद्यार्थ्यांनी कृषि शिक्षणास
प्राधान्य द्यावे. सद्या देशपातळीवर शालेय शिक्षणात कृषि विषय असल्याचे त्यांनी नमूद
केले.
अग्रणी बॅक (स्टेट बॅक ऑफ
इंडिया) चे माजी व्यवस्थापक श्री. सुनिल हटटेकर यांनी परभणी जिल्हयातील चुडावा (पुर्णा),
मंगरूळ (मानवत) व पाळोदी (परभणी) येथील १०० शेतकयांना
‘सिल्क आणि मिल्क’
योजना
बँके तर्फे मंजूर करण्यात येणार असुन रेशीम उद्योजक शेतकयांना
शेळी, गाय किंवा म्हैस
घेण्यासाठी रू. ८ लक्ष प्रति शेतकरी कर्जरूपाने देणार असल्याचे जाहिर केले. जिल्हा
रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम यांनी रेशीम उद्योगाबददल असलेल्या विविध
शासकिय योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी प्रमुख
अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,
कुलसचिव.श्री.
संतोष वेणीकर हे होते तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल,
सहयोगी
अधिष्ठाता डॉ. संजिव बंटेवाड, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम झंवर, विभाग
प्रमुख डॉ. पुरूषोत्तम नेहरकर, आगाम
साहेब, प्रभारी अधिकारी
डॉ. आनंद दौंडे, अग्रणी बॅक (स्टेट
बॅक ऑफ इंडिया) चे व्यवस्थापक श्री. उदय कुलकर्णी,
मुख्य
शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोलंकी, शास्त्रज्ञ
डॉ. हरिष अवारी, सहयोगी प्राध्यापक
डॉ. धिरज कदम, डॉ.मिलींद
सोनकांबळे, सहाय्यक
प्राध्यापक डॉ. अनंत लाड आदींची उपस्थिती होती.
खरा शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः समान बनवतो... कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि
शिक्षक दिनानिमित्त वनामकृवित नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनावर व्याख्यानमालेची सुरवात
शिक्षक
दिनाचे औचित्य साधून भारतीय मृदविज्ञान संस्था नवी दिल्लीच्या वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील शाखेच्या वतीने नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या विषया अंतर्गत व्याख्यानमालयाचे
उद्घाटन कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.
व्याख्यानाचे पहिले पुष्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शाश्वत शेतीसाठी स्मार्ट
तंत्रज्ञानासाठी संशोधन पद्धती शिकवणे; या विषयी
माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक दिन साजरा केला. याप्रसंगी
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार
शिक्षण संचालक डॉ.भगवान असेवार, संशोधन संचालक
डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद
इस्माईल, कुलसचिव श्री संतोष वेणीकर,
आदींची
उपस्थिती होती.
मार्गदर्शनात
कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी भविष्यातील नाविन्यपूर्ण संशोधनाचा
शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोग करता येईल यावर विवेचन केले.
विज्ञानातील प्रत्येक सिद्धांत व्यक्तीच्या जीवनाशी निगडित कसा आहे याबाबतचे
उदाहरणासहित स्पष्टीकरण देवून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कसे अवगत करता
येईल हे नमूद केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्य उल्लेखाचा गौरव करीत
त्यांच्या सहज आणि सरळ वृत्तीने शिक्षकांचा मोलाचा वाटा विद्यार्थ्यांचे जीवन
घडविण्यामध्ये कसा असतो यावर भाष्य केले. परीस लोखंडाला सोने बनवतो पण खरा शिक्षक
विद्यार्थ्यांना स्वतः समान बनवतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणारा हा
खरा शिक्षक आहे असे सांगून त्यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी
विवेकानंद, एम एस स्वामीनाथन, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या
तत्त्वज्ञानाची व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही शिक्षणामध्ये
शास्त्र, कला शिक्षणासोबतच उच्च दर्जेचे शिक्षण घेऊन योग्य प्रकारे जीवनात व सामाजिक
उन्नतीसाठी उपयोगात आणावे. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साधावा व कार्यमग्न
राहावे. शिक्षणाने ज्ञान, ज्ञानातून विनयशीलता, विनयशीलतेतून पात्रता, पत्रातेतून
धन आणि धनातून शक्ती प्राप्त होते. ज्ञान,
धन आणि शक्ती अनेकांना मिळते परंतु याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ज्ञान
वाटावे, धन दान करावे, आणि शक्ती चांगल्या कार्यासाठी वापरावी. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत
म्हणाले की, हे कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे शिक्षण पद्धती असून यामध्ये
दुहेरी संवादास महत्त्व दिलेआहे. यात भरपूर प्रमाणात लवचिकता ठेवलेली आहे.
याबरोबरच आपण ज्या संस्थेत कार्य करतो त्यास पूर्ण समर्पित भाव ठेवून कार्य करावे
व त्या संस्थेचे हित जपावे आणि आपल्या दैनंदिन कार्याचा तसेच जीवनाचा आनंद घ्यावा
असा सल्ला देवून विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना आशीर्वादरुपी शुभेच्छा
दिल्या.
प्रास्ताविकात
विभाग प्रमुख यांनी डॉ. प्रवीण वैद्य व्याख्यानमालेच्या आयोजनाचे महत्त्व आणि या
उपक्रमाचे सर्वकष माहिती दिली तर डॉ.रामप्रसाद खंदारे यांनी कुलगुरू मा. डॉ.
इन्द्र मणि यांचा कार्याचा परिचय करून दिला.
सूत्रसंचालन
डॉ. पपीता गोरखेडे तर आभार डॉ. सुदाम शिराळे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या
संख्येने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता,
विभाग
प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी
सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माननीय कुलगुरू यांचे तंत्र अधिकारी डॉ.
प्रवीण कापसे, श्री इंगळे, डॉ. संतोष फुलारी डॉ.अनिल धमक, डॉ.
महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर,
डॉ.
गजभिये, डॉ झाडे डॉ.चिक्षे डॉ. पिल्लेवाड, डॉ.
सिलेवंत, श्री भानुदास इंगोले श्री मदन
रणेर श्री आनंद नंदनवरे आणि विभागातील विद्यार्थी यांनीपरिश्रम घेतले.
Wednesday, September 4, 2024
माननीय कृषी मंत्री ना श्री धनंजयजी मुंडे यांची वनामकृवित आढावा बैठक
मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्राचे कृषि मंत्री ना श्री धनंजयजी मुंडे परभणीच्या दौऱ्यावर दिनांक ४
ऑगस्ट रोजी आले होते. यादरम्यान त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास
भेट दिली. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी माननीय कृषि मंत्री
ना श्री धनंजय मुंडे यांचे ऑनलाईन स्वागत केले. तसेच माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र
मणि यांना प्रतिष्ठित अभियंता पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मंत्री महोदयांच्या
हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य मा. श्री राजेश
विटेकर, माजी आमदार मा श्री मधुसूदन केंद्रे, निवासी
उपजिल्हाधिकारी श्री जीवराज दापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये माननीय कृषि मंत्री ना. श्री धनंजयजी मुंडे यांनी विद्यापीठाने अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे रक्षणाकरिता आणि सद्यस्थितीत पीक व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला व पुढे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून स्वयंचलीत शेती विकसित करावी तसेच ड्रोनद्वारे फवारणीबाबत चर्चा करून ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने सध्या आकारलेला दर कमी करावा. ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा असे नमूद केले. पिकांच्या उत्पादनामध्ये नॅनो खतांमुळे उत्पादन खर्चात ६० टक्के बचत होईल आणि उत्पादनात ५० % नी वाढ होवू शकते असे नॅनो खतांचे महत्त्व असल्याने नॅनो खताच्या वापरास चालना द्यावी. या विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे पिकांच्या पोषक तत्त्वांच्या ड्रोन-आधारित अनुप्रयोगांसाठी, ज्यात नॅनो फॉर्म्युलेशनचा समावेश आहे, यासाठीचे मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित करण्यासाठीच्या ड्रोन समितीचे अध्यक्ष असल्याने नॅनो खते मोफत देण्यासाठी शिफारस आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार द्यावा. याबरोबरच सोयाबीन उत्पादनामध्ये सोया मिल्क म्हणून उत्पादित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षिता आणि प्रमाण संस्था, यांच्याकडे पाठपुरावा करावा. याबरोबरच विद्यापीठांमध्ये बांबू लागवडीसाठी चालना देण्यासाठी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर तसेच रस्त्यालगत बांबूची लागवड करावी अशा सूचना दिल्या.
यावेळी
कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी बिजोत्पादनासाठी विद्यापीठाने साडेतीन हजार एकर
जमीन विकसित केल्याचे तसेच महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर बाबत माहिती दिली. संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाचे बीजोत्पादन मागील वर्षी १०२०० क्विंटल
झाले होते. यावर्षी हे लक्ष दुपटीने करून २०००० क्विंटलवर नेहण्यात येईल व
भविष्यात ५०००० क्विंटलचे लक्ष निर्धारित केल्याचे सांगितले तसेच विद्यापीठाने
शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाने विदेशातील व
देशातील अग्रगण्य विद्यापीठे व संस्थेसोबत सामंजस्य करार केले असुन याचा लाभ कुशल मनुष्यिबळ
निर्मिती करण्या्स होणार असल्याचे नमूद केले. तसेच विद्यापीठ शेतकरी केंद्रित
कार्य करत असून नियमित विस्तार कार्या बरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी
सात वाजता ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद घडवून आणला जातो. याबरोबरच प्रत्येक
महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू पासून ते विद्यापीठाच्या
सर्व कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांसाठी “माझा एक
दिवस माझ्या बळीराजा सोबत” हा विशेष उपक्रम राबवत आहेत असे
सांगितले.
कुलसचिव
डॉ. संतोष वेणीकर यांनी विद्यापीठाचा महसूल वाढ होण्याच्या दृष्टीने बीजोत्पादन
प्रकल्प,
उती संवर्धित केळी आणि उसांच्या रोपांना मागणी असल्याने या
प्रकल्पांना मंजूर देण्याची विनंती केली. यावेळी नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ,
विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी
अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर डी क्षीरसागर, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. राजेश कदम, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, लातूर
विभागाचे कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख,
विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ आदींची उपस्थिती होती.

Tuesday, September 3, 2024
सद्यस्थितीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
शंका
समाधानावर भर देण्याच्या कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या
सूचना
परभणी येथील वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर रोजी सद्यस्थितीत सोयाबीन
पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित केले.
अध्यक्षस्थानी कुलगुरू
मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. यावेळी
त्यांनी मराठवाड्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे खरीपाचे पिके संकटात आली आहेत.
पिकांचे सध्या योग्यपद्धतीने काळजी घेण्यासाठी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शंका
समाधानावर भर देण्याचे सूचित केले. कार्यक्रमासाठी संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख
मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तथा विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी सद्यस्थितीत सोयाबीन
पिकाची अवस्था. सोयाबीन पिवळे पडणे समस्या व त्याचे व्यवस्थापन. फुलांचे शेंगात
रुपांतर व शेंगा भरणीसाठी आवश्यक उपाययोजना. पाणी व्यवस्थापन व निचरा कसा करावा, संभाव्य
कीड, रोग व पिक संरक्षण. अन्नद्रव्य
कमतरता व व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगितल्या.
कार्यक्रमामध्ये
बहुसंखेने शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी पिकामध्ये साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या
परिणामाविषयी समस्या मांडल्या त्यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ
हरीश आवारी, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे यांनी उत्तरे देऊन समाधान केले.
कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंग, यु टूब, फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.

















