Sunday, February 15, 2026

तुळजाभवानी मातेसमोर शेतकरी कल्याणासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भावपूर्ण पूजाअर्चा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात विद्यापीठ तसेच राज्यातील शेतकरी बांधवांच्या शांती, समृद्धी व संपन्नतेसाठी भावपूर्ण पूजाअर्चा केली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्यासमवेत नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह हे उपस्थित होते. या पूजनप्रसंगी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने माननीय कुलगुरू यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

देवीचे दर्शन घेताना माननीय कुलगुरूंनी “शेतकरी देवो भवः” या भावनेचा उच्चार करत, कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने व समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या आरोग्य, प्रगती व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली.

या पूजाअर्चेच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार तसेच नव्या कल्पनांच्या आधारे ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला.

यावेळी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण थोरात, डॉ. भगवान अरबाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञानाधारित प्रगत संशोधन संसाधने व तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या लातूर येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” विषयावरील विचारमंथन कार्यशाळा संपन्न

शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी जनुकीय पातळीवरील अचूक संशोधन आवश्यक – प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे जैवतंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या पुरस्कृत “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” या विषयावर दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह उपस्थित होते. यावेळी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, गळीत धान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विचारमंथन कार्यशाळेत विद्यापीठातील पीक पैदास, वनस्पतीशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र व कीटकशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक तसेच पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण ४१ संशोधक सहभागी झाले होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि मर्यादित नैसर्गिक संसाधने यांचा विचार करता कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञान, जीनोम व जनुक बदल तसेच प्रगत संशोधन साधनांचा प्रभावी वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनात वाढ, कीड व रोग प्रतिकारशक्ती विकसित करणे तसेच पौष्टिक अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे शक्य झाले असून हे शाश्वत शेतीसाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी सहभागी संशोधकांना मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून डीएनए पातळीवर आधारित जनुकीय विकसित पिके, आण्विक जैवतंत्रज्ञानाधारित पीक प्रजनन प्रणाली, कमी कालावधीत अपेक्षित सुधारणा साध्य करण्यासाठी डीएनए मार्करचा वापर, प्रयोगशाळेत डीएनए पातळीवर वाणांची अचूक तपासणी, जैवतंत्रज्ञानाधारित रोग निदान प्रणाली तसेच हवामान-स्मार्ट पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी जीनोम एडिटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणातून स्पष्ट केले.

संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी मराठवाड्यातील विविध पिकांमधील समस्या व त्यावर जैवतंत्रज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच सर्व संशोधकांनी जनुकीय पातळीवरील संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विविध पिकांमध्ये अपेक्षित सुधारणा कशा साधता येतील, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयातील विविध संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी जनुकीय पातळीवर पिकांतील विविध गुणधर्म ओळखून त्यांचे प्रचलित वाणांमध्ये रूपांतर करून नवीन वाणांची निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि जिनोमिक्स फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात जैवतंत्रज्ञान विषयक अत्याधुनिक संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रावणी नवले व विवेक वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. योगेश भगत यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सारिका भालेराव, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. रमेश ढवळे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. दिप्ती वानखडे, सुरेखा आंबटवाड, सुरेश बिरादार, वीरभद्र दुरुगकर, अश्विनी गरड, अभिजित देशमुख, प्रतीक्षा जाधव, किशोर घोळवे, अंकिता इंगवले, प्रथमेश पवार, विनोद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.






परळी वैद्यनाथ येथे वनामकृविच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विशेष प्रार्थना

 

भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथ (जि. बीड) ज्योतिर्लिंग येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विशेष महादेव दर्शन व प्रार्थना करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महादेवाकडे मनोभावे प्रार्थना केली.

या प्रार्थनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कल्याण, विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तसेच विद्यापीठाच्या सर्वांगीण विकास व समृद्धीसाठी ईश्वरचरणी साकडे घालण्यात आले. याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड आणि डॉ. दिनेशसिंह चौव्हाण यांची उपस्थिती होती.

परळी वैद्यनाथ येथे केलेली ही प्रार्थना विद्यापीठाच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचे प्रतीक असून, शेतकरी-केंद्रित संशोधन, शिक्षण व विस्तारकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.




शिवव्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी शिवव्याख्यान; प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयात शिवजयंती उत्सवानिमित्त दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली प्रेरणादायी शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्लांट बायोटेक्नॉलॉजी येथील जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक डॉ. नागेंद्र कुमार सिंह तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या विचारांतून सांगितले की, साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ व लोककल्याणकारी विचार समाजमनात तेवते ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्यासारखे अभ्यासू, संशोधक वृत्तीचे व प्रभावी वक्ते सातत्याने करीत आहेत. शिवचरित्र केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता ते मूल्यशिक्षण, नेतृत्वगुण, शिस्त, धैर्य व नैतिकतेचा आदर्श म्हणून आजच्या पिढीसमोर मांडणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. युवापिढीने शिवविचार आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी वैयक्तिक जीवनासह सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी करावी, असे आवाहन करत त्यांनी कार्यक्रमाच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशा प्रकारची प्रेरणादायी व्याख्याने वारंवार आयोजित करणे अत्यंत आवश्यक असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा व मूल्यांची जाणीव होते.

यावेळी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी शिवकालीन इतिहासाची वर्तमान काळाशी सांगड घालत मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन, त्यांची दृष्टी, तसेच वेळ, भावना आणि पैसा यांचा योग्य उपयोग करणारा व्यक्ती निश्चितच यशस्वी होतो, असा यशाचा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आत्मविश्वासाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टीला नकार न देता ‘हे शक्य आहे’ या आत्मविश्वासातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत दाबके यांनी केले, तर आभार प्रदर्शन वामन काळबांडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य 
कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण 




 

छत्रपती शिवरायांच्या आदर्शातून संधी निर्माण करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

वनामकृविच्या लातूर येथील कृषि महाविद्यालयात शिवजयंती महोत्सवानिमित्त सांस्कृतिक स्पर्धांचे दिमाखदार आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर येथे प्रतिवर्षी साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव यंदाही अत्यंत उत्साहाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवानिमित्त दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्ष म्हणून लाभले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्यासह डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, डॉ. मोहन धुप्पे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. अशोक घोटमोकळे व डॉ. विजय भामरे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा लाभलेली ही भूमी पवित्र असल्याचे सांगितले. मोजक्याच साधनांमध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांनी संधींचा योग्य वापर करून नवनवीन संधी निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांसमोर विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध असून, कृषि महाविद्यालय लातूरचा परिसर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत पोषक आहे, अशी शाबासकीची थाप देत त्यांनी विद्यार्थ्यांनी योग्य शिक्षणासोबत शिवरायांचा आदर्श घेऊन कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासात सांस्कृतिक स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करत शैक्षणिक अभ्यासासोबत सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. यानंतर बहारदार गायन, शास्त्रीय व पाश्चात्य नृत्य तसेच भारतातील विविध प्रदेशांच्या लोकनृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना चषक, पदके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी शासकीय व बँक सेवेत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कारप्राप्त गुणवंत विद्यार्थी सुहास सोन्ने, कृष्णा गायकवाड, तुषार साळवे, शुभम गटकल, आशिष बिराजदार यांचा तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परीसंवादांमध्ये पुरस्कारप्राप्त सिद्धी देसाई, प्रतीक्षा खेडकर, सुशांत बिराजदार, कृष्णा देशमुख, मयूर मोरे, गौरव पाटील, नागेश वाघ, यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन निर्भय त्रिपाठी व वेदश्री पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजय भामरे यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने हा सांस्कृतिक महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.






Friday, February 13, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रम; शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणाऱ्या “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या निर्देशानुसार करण्यात येते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवून, विद्यापीठापासून दूर असलेल्या भागांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहोचविण्याच्या उद्देशाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण मराठवाडा विभागात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ९ चमूंमधील २५ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ३५० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील कार्यक्रमास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा विकास केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अशा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठ केवळ कृषि तंत्रज्ञान पुरविण्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय यंत्रणांचे सहकार्यही घेतले जाईल. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवः’ या तत्त्वावर कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद करून, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विविध योजना व सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. राकेश अहिरे यांनी सोयाबीन, तूर, कापूस व हळद या मराठवाड्यातील प्रमुख पिकांच्या अधिक उत्पादनासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी कापसाची घनपद्धतीने लागवड, सुधारित वाणांचा वापर तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाचा महिला मेळावा (३ जानेवारी), खरीप (१८ मे) व रब्बी (१७ सप्टेंबर) या शेतकरी मेळाव्यांची माहिती देत, बियाणे व निविष्ठा विक्री, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच कृषि प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच व्हॉट्सअॅप हेल्पलाईन, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल, ब्लॉग व ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे विद्यापीठ शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी हळद लागवड तंत्रज्ञान, खत व पाणी व्यवस्थापन तसेच लागवड पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळदीतील कंदमाशी व्यवस्थापन, कापूस लागवड तंत्रज्ञान व कीटकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयी माहिती दिली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, बदनापूर, खामगाव) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, प्रा. किशोर जगताप, डॉ. संजय पाटील, डॉ. सचिन धांडगे, श्री. मधुकर मांडगे, तसेच कृषि विभागाचे अधिकारी श्री. आनंद नंदनवरे, श्री. सचिन उबाळे व श्री. उदय देवळणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे ऑनलाइन मार्गदर्शन   

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे मार्गदर्शन करताना 
मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे प्रक्षेत्र भेट  
मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे प्रक्षेत्र भेट  
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना  
सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, मौजे काटे पिंपळगाव तालुका गंगापूर येथे महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना 


उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना 
सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना 
विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत प्र सुर्यवंशी मौजे औसा, जि लातूर येथे प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना 


 कृषि विज्ञान केंद्र, खामगावचे शास्त्रज्ञ डॉ. बी. बी. गायकवाड आणि प्रा. के. एल. जगताप मौजे राक्षसभुवन ता. गेवराई येथे प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना 

वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; विकासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी माननीय कुलगुरू महोदयांनी केंद्रातील नैसर्गिक शेती पद्धतीखाली घेतलेल्या भाजीपाला पिकांच्या संशोधन प्रात्यक्षिकांची, तसेच नैसर्गिक निविष्ठा (इनपुट) निर्मिती संचाची सखोल पाहणी केली. त्यांनी केंद्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत शेवगा, ड्रॅगन फ्रूट व कढीपत्ता यांची लागवड करण्याबाबत, तसेच उपलब्ध असलेली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणून हंगामी पिके व आच्छादन पिके (Cover Crops) घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. निविष्ठा निर्मितीसाठी विशेषतः नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र व विशेष निविष्ठा निर्मिती कक्ष स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच डाळी व भाजीपाला पिकांच्या देशी व स्थानिक वाणांचे (लँडरेसेस) संवर्धन, संकलन व मूल्यांकन यावर संशोधन हाती घेण्याच्या सूचनाही माननीय कुलगुरू यांनी दिल्या.

यावेळी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी भाजीपाला पिकांच्या देशी व स्थानिक वाणांचे मूल्यांकन, तसेच देशी व संकरित गोवंश जातींच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच केंद्रामध्ये मेक्सिकन (झायगोग्राम्मा) भुंगे (Zygogramma Beetle) संगोपन, गांडूळ खत (वर्मी-कंपोस्ट) निर्मिती व ट्रायकोडर्मा उत्पादनाचे व्यावसायिक कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले.

या भेटीदरम्यान माननीय अधिकाऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन अधिक प्रभावी व शेतकरीकेंद्रित करण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या भेटीच्या प्रसंगी केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, शाखा अभियंता श्री. शेख, कनिष्ठ अभियंता श्री. कटकुरी, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. दिलीप झटे, डॉ. तेजस्विनी कच्छवे, तसेच केंद्रातील कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.