Sunday, February 15, 2026

कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञानाधारित प्रगत संशोधन संसाधने व तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या लातूर येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” विषयावरील विचारमंथन कार्यशाळा संपन्न

शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी जनुकीय पातळीवरील अचूक संशोधन आवश्यक – प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे जैवतंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या पुरस्कृत “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” या विषयावर दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह उपस्थित होते. यावेळी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, गळीत धान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विचारमंथन कार्यशाळेत विद्यापीठातील पीक पैदास, वनस्पतीशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र व कीटकशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक तसेच पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण ४१ संशोधक सहभागी झाले होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि मर्यादित नैसर्गिक संसाधने यांचा विचार करता कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञान, जीनोम व जनुक बदल तसेच प्रगत संशोधन साधनांचा प्रभावी वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनात वाढ, कीड व रोग प्रतिकारशक्ती विकसित करणे तसेच पौष्टिक अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे शक्य झाले असून हे शाश्वत शेतीसाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी सहभागी संशोधकांना मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून डीएनए पातळीवर आधारित जनुकीय विकसित पिके, आण्विक जैवतंत्रज्ञानाधारित पीक प्रजनन प्रणाली, कमी कालावधीत अपेक्षित सुधारणा साध्य करण्यासाठी डीएनए मार्करचा वापर, प्रयोगशाळेत डीएनए पातळीवर वाणांची अचूक तपासणी, जैवतंत्रज्ञानाधारित रोग निदान प्रणाली तसेच हवामान-स्मार्ट पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी जीनोम एडिटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणातून स्पष्ट केले.

संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी मराठवाड्यातील विविध पिकांमधील समस्या व त्यावर जैवतंत्रज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच सर्व संशोधकांनी जनुकीय पातळीवरील संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विविध पिकांमध्ये अपेक्षित सुधारणा कशा साधता येतील, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयातील विविध संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी जनुकीय पातळीवर पिकांतील विविध गुणधर्म ओळखून त्यांचे प्रचलित वाणांमध्ये रूपांतर करून नवीन वाणांची निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि जिनोमिक्स फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात जैवतंत्रज्ञान विषयक अत्याधुनिक संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रावणी नवले व विवेक वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. योगेश भगत यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सारिका भालेराव, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. रमेश ढवळे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. दिप्ती वानखडे, सुरेखा आंबटवाड, सुरेश बिरादार, वीरभद्र दुरुगकर, अश्विनी गरड, अभिजित देशमुख, प्रतीक्षा जाधव, किशोर घोळवे, अंकिता इंगवले, प्रथमेश पवार, विनोद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.