वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी शिवव्याख्यान; प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयात शिवजयंती उत्सवानिमित्त दिनांक १५
फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
अध्यक्षतेखाली प्रेरणादायी शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या
कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट
फॉर प्लांट बायोटेक्नॉलॉजी येथील जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम
राष्ट्रीय प्राध्यापक डॉ. नागेंद्र कुमार सिंह तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार यांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय
भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या विचारांतून सांगितले
की, साडेतीनशे
वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ
व लोककल्याणकारी विचार समाजमनात तेवते ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रा. नितीन
बानगुडे पाटील यांच्यासारखे अभ्यासू, संशोधक वृत्तीचे व
प्रभावी वक्ते सातत्याने करीत आहेत. शिवचरित्र केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता
ते मूल्यशिक्षण, नेतृत्वगुण, शिस्त,
धैर्य व नैतिकतेचा आदर्श म्हणून आजच्या पिढीसमोर मांडणे ही काळाची
गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. युवापिढीने शिवविचार
आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी वैयक्तिक जीवनासह सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी
करावी, असे आवाहन करत त्यांनी कार्यक्रमाच्या उपक्रमशीलतेचे
कौतुक केले.
प्रमुख
पाहुणे डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशा प्रकारची प्रेरणादायी व्याख्याने वारंवार
आयोजित करणे अत्यंत आवश्यक असून, या माध्यमातून
विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा व मूल्यांची जाणीव होते.
यावेळी
शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी शिवकालीन इतिहासाची वर्तमान काळाशी
सांगड घालत मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन, त्यांची दृष्टी, तसेच
वेळ, भावना आणि पैसा यांचा योग्य उपयोग करणारा व्यक्ती
निश्चितच यशस्वी होतो, असा यशाचा मंत्र त्यांनी
विद्यार्थ्यांना दिला. आत्मविश्वासाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की,
कोणत्याही गोष्टीला नकार न देता ‘हे शक्य आहे’ या आत्मविश्वासातूनच
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत दाबके यांनी केले, तर आभार प्रदर्शन वामन काळबांडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




.jpeg)
.jpeg)

.jpeg)

