Monday, January 26, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आविष्कार–२०२६ महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलनाचे भव्य आयोजन

परभणी कृषि विद्यापीठाला राज्य संशोधन संमेलनाचे आयोजनाची संधी ही अभिमानाची बाब - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय लोकभवन कार्यालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. हा संशोधन महोत्सव दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या संशोधन महोत्सवात महाराष्ट्रातील कृषि  व अकृषि अशा एकूण २६ विद्यापीठांतील सुमारे ३८० संशोधक विद्यार्थी, ५२७ संशोधक विद्यार्थिनी असे ९०७ विद्यार्थी, तसेच १३० प्रतिनिधी यामध्ये संघ व्यवस्थापक व विद्यार्थी कल्याण संचालक, परीक्षक यांचा समावेश (विद्यार्थी व प्रतिनिधी एकूण १०३७ )असून विविध विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १५०० हून अधिक व्यक्ती या संमेलनात सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन क्षमतेचे सादरीकरण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

या संमेलनाच्या उद्घाटन व समारोप समारंभासाठी राज्यातील तसेच देशातील मान्यवर शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता क्रीडा संकुल, विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय परिसर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव  माननीय श्री. विकासचंद्र रस्तोगी (भा.प्र.से.), तसेच माननीय राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) यांचे  प्रधान सचिव माननीय डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.), नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. नितीन पाटील हे प्रमुख अतिथी आहेत. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री संजयसिंह चव्हाण (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक माननीय श्री रवींद्रसिंह परदेशी (भा.पो.से.), माननीय राज्यपाल यांचे शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय श्री विकास कुलकर्णी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यासोबतच विविध विद्यापीठांचे वरिष्ठ अधिकारी व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

तसेच समारोप समारंभ शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देखील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार आहेत.

समारोप समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त माननीय श्री जितेंद्र पापळकर (भा.प्र.से.) हे प्रमुख अतिथी म्हणून राहणार आहे. तसेच विविध विद्यापीठाचे सर्व संचालक आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या संशोधन संमेलनामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक आपल्या नाविन्यपूर्ण संशोधन सादरीकरणाद्वारे सहभाग नोंदवणार आहेत. नव्या संशोधनाला प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच कृषी व संलग्न क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या संशोधन महोत्सवासाठी पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती, अकोला, जळगाव, नांदेड, राहुरी, सोलापूर, गडचिरोली आदी भागांतील विद्यापीठांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोपक्रमशील विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘आविष्कार’ हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. आविष्कार–२०२६ संशोधन संमेलनाच्या माध्यमातून राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी एकत्र येऊन आपले संशोधन कार्य सादर करतील, ही बाब निश्चितच ज्ञाननिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला या राज्यस्तरीय संशोधन अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, या माध्यमातून मराठवाडा विभागातील शैक्षणिक व संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला

‘आविष्कार–२०२६’ अंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी खालील सहा प्रमुख विषय विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत —

1.        मानवविद्या, भाषा व ललित कला

2.        वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

3.        शुद्ध विज्ञान

4.        कृषी व पशुसंवर्धन

5.        अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

6.        वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच पीएच.डी. / पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

‘Innovation, Invention, Discovery’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या राज्य स्तरावरील आविष्कार–२०२६ संशोधन संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सह निमंत्रक तथा आजोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत. मराठवाडा विभाग तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत गौरवाचा ठरणार असून, आविष्कार–२०२६ संशोधन संमेलन या राज्यस्तरीय महत्त्वाच्या संमेलनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कार्यास नवी दिशा व नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे..


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन



भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात सकाळी ८ वाजता माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, भारत आज ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील विविध संविधानांचा अभ्यास करून अत्यंत उच्च दर्जाचे भारतीय संविधान निर्माण केले. “आम्ही भारताचे लोक” हीच संविधानाची खरी ओळख असून लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यांवर देश उभा आहे, असे त्यांनी नमूद केले.

२६ जानेवारी हा दिवस केवळ उत्सवाचा नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा तसेच गेल्या ७७ वर्षांत आपण काय साध्य केले व पुढील काळात देशाला कुठे घेऊन जायचे याचे चिंतन करण्याचा दिवस आहे. राष्ट्रप्रेम सर्वांत श्रेष्ठ असून राष्ट्रहितासाठी समर्पणभावनेने कार्य करणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरूंनी कृषि क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत सांगितले की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशाची लोकसंख्या ४० कोटी होती व अन्नधान्याची कमतरता होती. आज लोकसंख्या १४० कोटींच्या पुढे गेली असतानाही कृषि क्षेत्रातील क्रांतीमुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला असून अनेक कृषि उत्पादनांत देश अग्रस्थानी आहे. आज भारत जगातील महत्त्वाचा अन्नधान्य निर्यातदार ठरला असून मोठ्या प्रमाणात मोफत अन्नधान्य वितरणही सुरू आहे. या यशात शेतकरी, शास्त्रज्ञ व नियोजनकर्त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच योगदानाचे प्रतीक म्हणून यावर्षी कृषि क्षेत्रातील आठ व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यापैकी सहा पद्मश्री सन्मानित व्यक्तींनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट दिली असून उर्वरित संपर्कात आहेत, हे विद्यापीठासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ शेतकरी केंद्रित कार्य करत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर “शेतकऱ्यांचा कुलगुरू” अशी ओळख निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

“शेतकरी देवो भवः” या संकल्पनेतून विद्यापीठ विस्तार कार्य राबवत असून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविला जात आहे. या उपक्रमाची देशपातळीवर सकारात्मक दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पद्मश्री सन्मानित शेतकरी श्री श्रीरंग देवबा लाड (श्री दादा लाड) यांना विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभात ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली होती. त्या सन्मानास देशानेही मान्यता देत त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख माननीय कुलगुरूंनी केला.

विद्यापीठ संशोधन, विस्तार व शिक्षण क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असून ५०० एकरवर क्लीन कॉटनचा दिशादर्शक प्रकल्प, बीजोत्पादन विकास, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा, याबरोबरच शैक्षणिक व संशोधनातील अनेक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवरील विश्वासार्हता अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, प्रशासकीय सुधारणा, कर्मचारी व विद्यार्थी केंद्रित धोरणांमुळे विद्यापीठ मजबूत स्थितीत उभे राहिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी त्यांनी विद्यापीठाची प्रगती ही सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने आपली क्षमता व कौशल्य वृद्धिंगत करून देशात विद्यापीठ अग्रस्थानी नेण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रीमती जयश्री मिश्रा, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले.  कार्यक्रमास विद्यापीठातील आजी-माजी विभाग प्रमुख प्राध्यापक अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
















Sunday, January 25, 2026

कृषि क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी माननीय श्री दादा लाड यांना पद्म पुरस्कार जाहीर; वनामकृवि परिवाराकडून अभिनंदन

शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा गौरव..अशी भावना माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी व्यक्त केली


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून सन २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ प्रगतीशील शेतकरी व कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माननीय श्री. दादा लाड यांना जाहीर झालेला पद्म पुरस्कार हा देशातील शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनवृत्ती व कृषी नवोन्मेषाचा सन्मान असल्याची भावना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली. या गौरवामुळे भारतीय शेतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांना नवी प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठ परिवाराच्या वतीने माननीय श्री. दादा लाड यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत उत्पादन पद्धती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे देशासाठी मार्गदर्शक ठरणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभामध्ये माननीय श्री. दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील अतुलनीय, नाविन्यपूर्ण व दीर्घकालीन योगदानाबद्दल “डॉक्टर ऑफ सायन्स” (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने त्यांच्या कार्याची दखल घेतलेली असून, आज मिळालेला पद्म पुरस्कार हा त्यांचा मोठा सन्मान असल्याची भावना माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड यांचा शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण व घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेले “दादा लाड कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. सन २००२–०३ पासून शेतकरी-आधारित संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता कमी करणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या प्रारंभिक छाटणीची प्रभावी व शास्त्रीय पद्धत विकसित केली.
शेंडा खुडणी, अतीघन लागवड, ठिबक सिंचन व आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी एक समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन अधिक होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी घटतो तसेच शेतकऱ्यांचा नफा लक्षणीयरीत्या वाढतो.
यासोबतच, गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धन, संरक्षण व प्रसारासाठी अत्यंत उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले असून त्यांचे हे योगदान कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.


वनामकृविच्या २७ व्या दीक्षांत समारंभात माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड (श्री. दादा लाड) यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवीने सन्मानित





Saturday, January 24, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचे उद्घाटन

 विद्यार्थ्यांनी पदवीबरोबरच उत्कृष्ट कौशल्य आत्मसात करावीत - शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अनुसूचित जाती उप-योजना (SCSP) अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत “वैज्ञानिक मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कृषि कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर उपस्थित होते, तर कृषिभूषण तथा कृषि उद्योजक श्री. दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करावीत. प्राप्त कौशल्यांचा उपयोग शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सेवाभावी वृत्तीने करावा, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधुमक्षिका पालन व मध उत्पादनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, आज मध उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. जागतिक पातळीवर मधाची मोठी बाजारपेठ निर्माण होत असून आरोग्य व वनौषधी दृष्टीने मधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात नवउद्योजक म्हणून करिअर घडवावे, असे त्यांनी सांगितले.

कृषि उद्योजक श्री. दिनकर पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मधुमक्षिका पालन व मध उत्पादनाविषयी आपल्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सखोल माहिती दिली. व्यावसायिक यशासाठी योग्य नियोजन, सातत्य व गुणवत्तेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रास्ताविक डॉ. संजीव बंटेवाड यांनी मांडले. आयोजन डॉ. विद्या तायडे (कृषि विस्तार शिक्षण) यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुमारी स्नेहल सरवदे यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमानंतर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या कृषि कार्यानुभव अंतर्गत सुरू असलेल्या आळंबी (मशरूम) लागवड व उत्पादन प्रकल्पास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.





रेशीम उद्योगातून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी : माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात गोळेगाव येथे रेशीम उद्योग उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगाव (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अनुसूचित जाती उप-योजना (SCSP) अंतर्गत तीन दिवसीय रेशीम उद्योग उद्योजकता विकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे तसेच महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर शेती विकास उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जमीन दुरुस्ती, साफसफाई, सिंचन पाईपलाईन टाकणे, बांध बंधिस्ती, चर खोदणे व पाण्याच्या निचऱ्यासाठी पाईप बसविणे या विविध विकासात्मक कामांचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, रेशीम शेती हा अल्पभूधारक व युवकांसाठी उत्पन्नाचा शाश्वत आणि खात्रीशीर स्रोत असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचे कौशल्य आत्मसात करावे, स्वतःवर विश्वास ठेवून नाविन्यपूर्ण विचारसरणी विकसित करावी तसेच लहान-सहान अडचणींचा ताण न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. ते म्हणाले की, रेशीम शेतीतील तांत्रिक कौशल्य आत्मसात केल्यास युवक स्वतः उद्योजक बनू शकतातच, शिवाय रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यातही मोलाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थींनी मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतपातळीवर उपयोग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ओ. एल. जाधव तसेच रेशीम तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रास्ताविकात डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यांचे सखोल ज्ञान देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.

डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी रेशीम शेतीचे आर्थिक महत्त्व विशद करत कोष पालन, रोग व्यवस्थापन व उत्पादन वाढीच्या तंत्रांवर मार्गदर्शन केले. केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ओ. एल. जाधव यांनी केंद्र व राज्य शासनाच्या रेशीम शेतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध अनुदान योजना, प्रशिक्षण व सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल भालेराव यांनी तुतीची पाने व फळांपासून तयार करता येणाऱ्या विविध मूल्यवर्धित पदार्थांद्वारे अतिरिक्त उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एस. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डी. एन. मोहोड यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. प्रविण राठोड, डॉ. डी. एच. सारंग, डॉ. पी. के. वाघमारे, प्रा. ज्योती गायकवाड, डॉ. डी. पी. देशपांडे, श्री. प्रवीण दंडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. एम. ताटके, श्री. शेख सलीम, श्री. जी. एन. नाईक, श्री. डी. के. पवार, श्री. सी. एल. ताटीकोंडलवार, श्री. एस. डी. आडे, श्री. बी. आर. खुडे, श्री. एम. डी. गुव्हाडे, श्री. पी. बी. हंबर्डे, श्री. एम. एम. खटींग, श्री. जी. ओ. जाधव, श्रीमती एम. एस. भिसे, श्रीमती आर. पी. बुरकुले तसेच महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.





आंतरराष्ट्रीय कृषि महोत्सवात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री स्वामी समर्थ ट्रस्ट, दिंडोरी यांच्या वतीने नाशिक येथील युवक महोत्सव मैदानावर दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवात दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी नैसर्गिक व सेंद्रिय शेती या विषयावर शेतकरी, कृषी उद्योजक तसेच युवकांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, नैसर्गिक शेती ही शाश्वत विकासाची प्रभावी दिशा असून मातीचे आरोग्य जपणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक व नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेली बैलचालित सुधारित अवजारे व यंत्रे वापरल्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील मशागतीवरील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वतीने नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठामार्फत नैसर्गिक शेती मॉडेलची स्थापना, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भव्य प्रदर्शनात विद्यापीठाच्या विविध कृषी तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, प्रक्रिया-आधारित नमुने तसेच नैसर्गिक शेतीवर आधारित मॉडेलला शेतकरी व नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. माननीय कुलगुरूंनी विविध स्टॉलना भेट देऊन उत्पादकांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

या प्रदर्शनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दालन पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना प्रभारी अधिकारी तथा संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले होते.

यामध्ये पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे, अभियंता श्री दीपक राऊत, श्री दीपक यंदे, श्री रुपेश काकडे व श्री मंगेश खाडे यांनी उपस्थित शेतकरी व अभ्यागतांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

विद्यापीठाच्या अवजारे स्टॉलला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, या महोत्सवाचे संयोजक परमपूज्य माऊली आबासाहेब मोरे, सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन विद्यापीठाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

या आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवात देशभरातील शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.














Friday, January 23, 2026

बालवयातील संस्कारच भविष्यातील व्यक्तिमत्त्व घडवतात – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेचा ‘टॅलेंट शो’ उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातील प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित ‘टॅलेंट शो’ कार्यक्रम दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती जयश्री मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (कृषि), डॉ. राहुल रामटेके (सामुदायिक विज्ञान), माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, बालकांचा सर्वांगीण विकास त्यांच्या लहान वयात घडतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते. ते पुढे म्हणाले की,  विद्यापीठात केजी ते पीजीपर्यंत शिक्षण दिले जात असल्याचा अभिमान वाटतो. या विद्यापीठात समग्र शिक्षण पद्धती राबविण्यात येत असून, पूर्व-प्रायोगिक प्राथमिक शाळा, पदविका अभ्यासक्रम, पदवी ते आचार्य पदवीपर्यंत सर्व स्तरांवरील शिक्षण येथे उपलब्ध आहे. ही शाळा म्हणजे एक प्रयोगशाळा असून, येथील चिमुकले विद्यार्थी हीच त्या प्रयोगशाळेतील इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्यांची योग्य हाताळणी व देखभाल यावर घडणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या शाळेचा आणि बालकांचा योग्य विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांचा भावनिक व मानसिक विकास तितकाच आवश्यक आहे. सध्या तंत्रज्ञानाचा विकास उच्च पातळीवर झाला असून, त्याचा सकारात्मक परिणाम होणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना सजग करणे आवश्यक आहे.

मुलांकडून योग्य अपेक्षा ठेवाव्यात; त्यांना रोबोट बनवू नये किंवा आपल्याच अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत. मुलांसोबत मोकळा संवाद ठेवावा, त्यांना चांगले संस्कार द्यावेत व त्यांच्यात नीतीमूल्यांची जोपासना करावी. मुले आपले अनुकरण करत असतात, त्यामुळे आपण स्वतःही संस्कारी असणे आवश्यक आहे. आपले संस्कार हे आपल्या स्वभावातूनच प्रकट होत असतात. घरामध्ये विनम्रतेचा भाव वाढवावा. महाराष्ट्राची संस्कृती अतिशय समृद्ध असून, तिचा लाभ येथे मिळत आहे.

या शाळेत शिकणारी चिमुकली मुले पुढील शतक पाहणार आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास शाळेमधूनच घडावा, अशी अपेक्षा माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नमूद केले की, बालकांचा खरा विकास हा त्यांच्या सुरुवातीच्या बालवयातच म्हणजे जवळपास आठ वर्षांपर्यंत घडत असतो. याच काळात त्यांच्या विचारांची पायाभरणी होते, व्यक्तिमत्त्व घडते आणि भविष्यातील वाटचालीची दिशा ठरते. हे महत्त्वपूर्ण कार्य या पूर्व प्रायोगिक प्राथमिक शाळेमार्फत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले जात आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. या शाळेतून घडणारे विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करतात, अशी या शाळेची ख्याती आहे. म्हणूनच परभणी शहरातील नामांकित तसेच सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ अभ्यासावरच भर दिला जात नाही, तर मुलांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील असा सर्वांगीण विकास साधला जातो. आजचा हा टॅलेंट शो म्हणजे त्याच सर्वांगीण विकासाचा एक सुंदर भाग आहे. या मंचावरून मुलांमधील कला, आत्मविश्वास, कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य यांना नवी दिशा मिळत आहे. आज ही छोटी-छोटी मुले उद्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून समाजासमोर उभी राहणार आहेत. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी, सुदृढ विचारांसाठी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवनासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि शाळा प्रशासनाचे मी अभिनंदन करून या चिमुकल्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

डॉ. जया बंगाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांना शाळा निवडताना मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, मातृभाषेतून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा मजबूत पाया घडवते. मातृभाषेमधून शिकलेल्या संकल्पना मूलभूत पातळीवर स्पष्ट होत असून त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. यावेळी त्यांनी आई ही केवळ जन्म देणारी नसून ती संस्कारांची पहिली गुरू असते असे सांगत मातेच्या आदराचे आणि संस्कारांचे महत्त्व विशद केले. तसेच एल. पी. पी. स्कूलच्या चार वर्षांच्या सर्वसमावेशक पॅकेजद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक व नैतिक असा सर्वांगीण विकास घडून येतो, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

प्रास्ताविकात डॉ. वीणा भालेराव यांनी सांगितले की, या टॅलेंट शोचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बालकांवर कोणताही भडक मेकअप किंवा वजनदार पोशाख वापरण्यात आलेला नाही. तसेच निवडलेली गीते ही त्यांच्या दैनंदिन अभ्यासक्रमाशी व कुटुंबातील वापरातील वस्तूंशी निगडित आहेत. त्यामुळे बालकांना ही गीते कोणत्याही दडपणाशिवाय सहजपणे सादर करता येतात. या गीतांचा सराव त्यांच्या संबंधित वर्गशिक्षकांमार्फतच करून घेण्यात आला. परिणामी बालक विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेत आपली कलागुण सादर केली.

टॅलेंट शोमध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य, समूह नृत्य, अभिनय, गीत सादरीकरण, व्यक्तिमत्त्व प्रदर्शन आदी कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे सभागृहात टाळ्यांचा गजर झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ वीणा भालेराव, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड तसेच प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन व आभार सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राजेश्वरी मरकड व श्रावणी जाधव यांनी केले. कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या कलागुणांना पालकांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा टॅलेंट शो विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि आनंददायी आठवणी देणारा ठरला.