Monday, January 26, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन



भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात सकाळी ८ वाजता माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, भारत आज ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील विविध संविधानांचा अभ्यास करून अत्यंत उच्च दर्जाचे भारतीय संविधान निर्माण केले. “आम्ही भारताचे लोक” हीच संविधानाची खरी ओळख असून लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यांवर देश उभा आहे, असे त्यांनी नमूद केले.

२६ जानेवारी हा दिवस केवळ उत्सवाचा नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा तसेच गेल्या ७७ वर्षांत आपण काय साध्य केले व पुढील काळात देशाला कुठे घेऊन जायचे याचे चिंतन करण्याचा दिवस आहे. राष्ट्रप्रेम सर्वांत श्रेष्ठ असून राष्ट्रहितासाठी समर्पणभावनेने कार्य करणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरूंनी कृषि क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत सांगितले की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशाची लोकसंख्या ४० कोटी होती व अन्नधान्याची कमतरता होती. आज लोकसंख्या १४० कोटींच्या पुढे गेली असतानाही कृषि क्षेत्रातील क्रांतीमुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला असून अनेक कृषि उत्पादनांत देश अग्रस्थानी आहे. आज भारत जगातील महत्त्वाचा अन्नधान्य निर्यातदार ठरला असून मोठ्या प्रमाणात मोफत अन्नधान्य वितरणही सुरू आहे. या यशात शेतकरी, शास्त्रज्ञ व नियोजनकर्त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच योगदानाचे प्रतीक म्हणून यावर्षी कृषि क्षेत्रातील आठ व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यापैकी सहा पद्मश्री सन्मानित व्यक्तींनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट दिली असून उर्वरित संपर्कात आहेत, हे विद्यापीठासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ शेतकरी केंद्रित कार्य करत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर “शेतकऱ्यांचा कुलगुरू” अशी ओळख निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी देवो भवः” या संकल्पनेतून विद्यापीठ विस्तार कार्य राबवत असून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविला जात आहे. या उपक्रमाची देशपातळीवर सकारात्मक दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पद्मश्री सन्मानित शेतकरी श्री श्रीरंग देवबा लाड (श्री दादा लाड) यांना विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभात ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली होती. त्या सन्मानास देशानेही मान्यता देत त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख माननीय कुलगुरूंनी केला.

विद्यापीठ संशोधन, विस्तार व शिक्षण क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असून ५०० एकरवर क्लीन कॉटनचा दिशादर्शक प्रकल्प, बीजोत्पादन विकास, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा, याबरोबरच शैक्षणिक व संशोधनातील अनेक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवरील विश्वासार्हता अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, प्रशासकीय सुधारणा, कर्मचारी व विद्यार्थी केंद्रित धोरणांमुळे विद्यापीठ मजबूत स्थितीत उभे राहिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी त्यांनी विद्यापीठाची प्रगती ही सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने आपली क्षमता व कौशल्य वृद्धिंगत करून देशात विद्यापीठ अग्रस्थानी नेण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रीमती जयश्री मिश्रा, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले.  कार्यक्रमास विद्यापीठातील आजी-माजी विभाग प्रमुख प्राध्यापक अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.