वनामकृवितील प्रायोगिक
पूर्व-प्राथमिक शाळेचा ‘टॅलेंट शो’ उत्साहात संपन्न
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत
सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातील
प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित ‘टॅलेंट शो’ कार्यक्रम दिनांक २३
जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती जयश्री
मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण
वैद्य (कृषि), डॉ.
राहुल रामटेके
(सामुदायिक विज्ञान), माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी सांगितले की, बालकांचा सर्वांगीण विकास त्यांच्या लहान वयात
घडतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता
व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठात केजी ते पीजीपर्यंत शिक्षण दिले जात
असल्याचा अभिमान वाटतो. या विद्यापीठात समग्र शिक्षण पद्धती राबविण्यात येत असून,
पूर्व-प्रायोगिक प्राथमिक शाळा, पदविका
अभ्यासक्रम, पदवी ते आचार्य पदवीपर्यंत सर्व स्तरांवरील
शिक्षण येथे उपलब्ध आहे. ही शाळा म्हणजे एक प्रयोगशाळा असून, येथील चिमुकले विद्यार्थी हीच त्या प्रयोगशाळेतील इन्स्ट्रुमेंट्स आहेत.
त्यांची योग्य हाताळणी व देखभाल यावर घडणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या
शाळेचा आणि बालकांचा योग्य विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका
अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांचा भावनिक व मानसिक विकास तितकाच आवश्यक आहे.
सध्या तंत्रज्ञानाचा विकास उच्च पातळीवर झाला असून, त्याचा
सकारात्मक परिणाम होणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना सजग करणे आवश्यक आहे.
मुलांकडून योग्य
अपेक्षा ठेवाव्यात; त्यांना रोबोट बनवू
नये किंवा आपल्याच अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत. मुलांसोबत मोकळा संवाद ठेवावा,
त्यांना चांगले संस्कार द्यावेत व त्यांच्यात नीतीमूल्यांची जोपासना
करावी. मुले आपले अनुकरण करत असतात, त्यामुळे आपण स्वतःही
संस्कारी असणे आवश्यक आहे. आपले संस्कार हे आपल्या स्वभावातूनच प्रकट होत असतात.
घरामध्ये विनम्रतेचा भाव वाढवावा. महाराष्ट्राची संस्कृती अतिशय समृद्ध असून,
तिचा लाभ येथे मिळत आहे.
या शाळेत
शिकणारी चिमुकली मुले पुढील शतक पाहणार आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास
शाळेमधूनच घडावा, अशी अपेक्षा माननीय
कुलगुरूंनी व्यक्त केली.
शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार यांनी नमूद केले की, बालकांचा खरा विकास हा त्यांच्या
सुरुवातीच्या बालवयातच म्हणजे जवळपास आठ वर्षांपर्यंत घडत असतो. याच काळात
त्यांच्या विचारांची पायाभरणी होते,
व्यक्तिमत्त्व घडते आणि भविष्यातील वाटचालीची दिशा ठरते. हे
महत्त्वपूर्ण कार्य या पूर्व प्रायोगिक प्राथमिक शाळेमार्फत अत्यंत उत्कृष्ट
पद्धतीने केले जात आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. या
शाळेतून घडणारे विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करतात, अशी या शाळेची ख्याती आहे. म्हणूनच परभणी शहरातील नामांकित तसेच
सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील
असतात. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ अभ्यासावरच भर दिला जात नाही,
तर मुलांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील असा सर्वांगीण विकास साधला जातो. आजचा हा टॅलेंट शो
म्हणजे त्याच सर्वांगीण विकासाचा एक सुंदर भाग आहे. या मंचावरून मुलांमधील कला,
आत्मविश्वास, कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य
यांना नवी दिशा मिळत आहे. आज ही छोटी-छोटी मुले उद्या देशाचे जबाबदार नागरिक
म्हणून समाजासमोर उभी राहणार आहेत. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी, सुदृढ विचारांसाठी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवनासाठी असे उपक्रम अत्यंत
आवश्यक आहेत. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि शाळा प्रशासनाचे मी अभिनंदन करून या चिमुकल्या बालकांच्या उज्वल
भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. जया
बंगाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांना शाळा निवडताना मराठी माध्यमाच्या
शाळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, मातृभाषेतून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या
बौद्धिक विकासाचा मजबूत पाया घडवते. मातृभाषेमधून शिकलेल्या संकल्पना मूलभूत
पातळीवर स्पष्ट होत असून त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. यावेळी त्यांनी आई ही केवळ
जन्म देणारी नसून ती संस्कारांची पहिली गुरू असते असे सांगत मातेच्या आदराचे आणि
संस्कारांचे महत्त्व विशद केले. तसेच एल. पी. पी. स्कूलच्या चार वर्षांच्या
सर्वसमावेशक पॅकेजद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक,
बौद्धिक व नैतिक असा सर्वांगीण विकास घडून येतो, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
प्रास्ताविकात
डॉ. वीणा भालेराव यांनी सांगितले की,
या टॅलेंट शोचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बालकांवर कोणताही भडक
मेकअप किंवा वजनदार पोशाख वापरण्यात आलेला नाही. तसेच निवडलेली गीते ही त्यांच्या
दैनंदिन अभ्यासक्रमाशी व कुटुंबातील वापरातील वस्तूंशी निगडित आहेत. त्यामुळे
बालकांना ही गीते कोणत्याही दडपणाशिवाय सहजपणे सादर करता येतात. या गीतांचा सराव
त्यांच्या संबंधित वर्गशिक्षकांमार्फतच करून घेण्यात आला. परिणामी बालक
विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेत आपली कलागुण सादर केली.
टॅलेंट
शोमध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य, समूह नृत्य, अभिनय,
गीत सादरीकरण, व्यक्तिमत्त्व प्रदर्शन आदी
कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण
सादरीकरणामुळे सभागृहात टाळ्यांचा गजर झाला.
कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ वीणा भालेराव,
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड तसेच प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेतील शिक्षक
व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन व आभार सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राजेश्वरी मरकड व श्रावणी जाधव यांनी केले. कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या कलागुणांना पालकांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा टॅलेंट शो विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि आनंददायी आठवणी देणारा ठरला.


