विद्यार्थ्यांनी पदवीबरोबरच उत्कृष्ट कौशल्य आत्मसात करावीत - शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि
महाविद्यालय अंबाजोगाई येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी
दिल्ली यांच्या अनुसूचित जाती उप-योजना (SCSP) अंतर्गत महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत “वैज्ञानिक
मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
आहे.
या प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कृषि
कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर उपस्थित होते, तर कृषिभूषण तथा कृषि उद्योजक श्री. दिनकर
पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ.
संजीव बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी
मार्गदर्शन करताना डॉ. भगवान आसेवार म्हणाले की,
विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध
क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करावीत. प्राप्त कौशल्यांचा
उपयोग शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सेवाभावी वृत्तीने करावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी डॉ.
पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधुमक्षिका पालन व मध उत्पादनाचे महत्त्व विशद करताना
सांगितले की, आज मध उत्पादन
क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. जागतिक पातळीवर मधाची मोठी बाजारपेठ
निर्माण होत असून आरोग्य व वनौषधी दृष्टीने मधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात नवउद्योजक म्हणून करिअर घडवावे, असे त्यांनी सांगितले.
कृषि उद्योजक
श्री. दिनकर पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मधुमक्षिका पालन व मध
उत्पादनाविषयी आपल्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सखोल माहिती दिली. व्यावसायिक
यशासाठी योग्य नियोजन, सातत्य व गुणवत्तेचे
महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविक डॉ.
संजीव बंटेवाड यांनी मांडले. आयोजन डॉ. विद्या तायडे (कृषि विस्तार शिक्षण) यांनी
केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुमारी स्नेहल सरवदे यांनी केले. या
प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमानंतर
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास भेट देऊन आवश्यक
त्या सूचना दिल्या तसेच आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या कृषि कार्यानुभव अंतर्गत
सुरू असलेल्या आळंबी (मशरूम) लागवड व उत्पादन प्रकल्पास भेट देऊन विद्यार्थ्यांशी
संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

.jpeg)
.jpeg)


