प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून सन २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ प्रगतीशील शेतकरी व कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माननीय श्री. दादा लाड यांना जाहीर झालेला पद्म पुरस्कार हा देशातील शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनवृत्ती व कृषी नवोन्मेषाचा सन्मान असल्याची भावना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली. या गौरवामुळे भारतीय शेतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांना नवी प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठ परिवाराच्या वतीने माननीय श्री. दादा लाड यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत उत्पादन पद्धती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे देशासाठी मार्गदर्शक ठरणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभामध्ये माननीय श्री. दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील अतुलनीय, नाविन्यपूर्ण व दीर्घकालीन योगदानाबद्दल “डॉक्टर ऑफ सायन्स” (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने त्यांच्या कार्याची दखल घेतलेली असून, आज मिळालेला पद्म पुरस्कार हा त्यांचा मोठा सन्मान असल्याची भावना माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड यांचा शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण व घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेले “दादा लाड कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. सन २००२–०३ पासून शेतकरी-आधारित संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता कमी करणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या प्रारंभिक छाटणीची प्रभावी व शास्त्रीय पद्धत विकसित केली.
शेंडा खुडणी, अतीघन लागवड, ठिबक सिंचन व आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी एक समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन अधिक होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी घटतो तसेच शेतकऱ्यांचा नफा लक्षणीयरीत्या वाढतो.
यासोबतच, गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धन, संरक्षण व प्रसारासाठी अत्यंत उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले असून त्यांचे हे योगदान कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
वनामकृविच्या २७ व्या दीक्षांत समारंभात माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड (श्री. दादा लाड) यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवीने सन्मानित
.jpeg)